आयटी पार्कचा झाला खेळखंडोबा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

कधी ‘एमआयडीसी’चे धोरण, तर कधी संघटनांची भूमिका भोवली

कधी ‘एमआयडीसी’चे धोरण, तर कधी संघटनांची भूमिका भोवली

नाशिक - राज्य शासनातर्फे २००३ मध्ये दोन कोटी २३ लाख रुपये खर्चून अंबडला उभारण्यात आलेला ‘आयटी पार्क’ नाशिकच्या औद्योगिक विकासात योगदान देऊ शकला नाही. छोट्या काय अन्‌ मोठ्या काय, कुठल्याही आयटी कंपनीला येथे स्थान मिळू शकले नाही. कधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) वाढीव दराचे धोरण, तर कधी संघटनांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आयटी पार्कची वास्तू पडीतच राहिली. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर आपल्याला करून घेता आल्यास ‘मेक इन नाशिक’ यशस्वी होऊ शकेल. अन्यथा आयटी पार्कप्रमाणे अन्य प्रकल्पांचाही खेळखंडोबा होत राहील.

आयटी पार्कच्या जागेसंदर्भात अनेकदा खासदार, आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पत्रकबाजी झाली. उद्योगमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, आयटी उद्योगाला त्याचा फायदा होऊ शकला नाही. आयटी पार्क उभारल्यानंतर पुढील तीन-चार वर्षांत मुंबई, पुण्यातील कंपन्यांना नाशिककडे वळविण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु, कधी दरांचे कारण, तर कधी संघटनांच्या आडकाठीमुळे अनेक वर्षे आयटी पार्क पडीत राहिला.

प्रतिसादाअभावी आयटी उद्योगासाठी २८ प्लॉटचे आरक्षण उठविण्याची वेळ ओढवली. सद्यस्थितीत महिंद्र राइज व अन्य सात-आठ कंपन्या येथे कार्यरत आहेत.

आयटी पार्कमध्ये छोट्या आयटी उद्योजकांना सुविधा उपलब्ध करून देत फायदा करून घेता आला असता. परंतु, ‘एमआयडीसी’ला ते जमले नाही. दुसरीकडे विप्रो, ‘टीसीएस’सारख्या मोठ्या कंपन्या ही वास्तू घेण्याच्या तयारी असताना औद्योगिक संघटनांचे धोरण मारक ठरले. 

‘एमआयडीसी’चे प्रयत्न निष्फळ
जागेचा वापर होत नसल्याने ‘एमआयडीसी’ने लिलावातून आयटी पार्कमधील गाळे विक्रीसाठी अनेक वेळा प्रक्रिया राबविली. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. एप्रिल २०१३ मध्ये झालेल्या लिलावात २४ हजार ५३० रुपये प्रति स्क्‍वेअर मीटर दर निश्‍चित करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये पुन्हा एकदा नऊ टक्‍के घट करीत २२ हजार ३०० रुपये स्क्‍वेअर मीटर दराने प्रक्रिया राबवूनही प्रतिसाद मिळाला नाही. या दरम्यान मासिक भाडे आकारून इमारत देण्याचाही प्रयत्न उपयोगात आला नाही. मार्च २०१६ मध्ये तिसऱ्यांदा झालेला लिलावही निष्फळ ठरला. या दरम्यान ‘एमआयडीसी’चा इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरमहा सुमारे चाळीस हजार रुपये खर्च मात्र सुरूच राहिला.
 

प्रमोद महाजन यांचा शब्द ठरला खरा
आयटी पार्कचे उद्‌घाटन भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हस्ते झाले होते. कात्रीने फित कापून हा उद्‌घाटन सोहळा पार पडला होता. त्या वेळी, ‘कात्रीने उद्‌घाटन करायला लावता आहात, तर या प्रकल्पाचे भवितव्य काय असेल? आयटी पार्कचे उद्‌घाटन हे रिमोट कंट्रोलने व्हायला हवे होते,’ असे (कै.) महाजन त्या वेळी म्हणाले होते. दुर्दैवाने त्यांचा शब्द खरा ठरला व आयटी पार्कचा वापर होऊ शकला नाही.

आकडे बोलतात...

३५० - नाशिकमधील आयटी कंपन्या

५,००० - आयटी उद्योगातून रोजगार

१,००० - दरवर्षी नोकरीचा शोध घेणाऱ्यांची संख्या

Web Title: it park issue