जखमी जवानाच्या उपचारासाठी जैताणे ग्रामपंचायतीतर्फे 21 हजाराचा धनादेश

भगवान जगदाळे
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील मूळ रहिवासी व राज्य राखीव बल गट क्रमांक-6 चे जवान साहेबराव सुका चव्हाण (वय-38) हे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात गस्तीवर असताना 23 जुलैला नक्षलवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पोटाच्या डाव्या बाजूला गोळी लागून ती आरपार निघाली. पण सुदैवाने किडनी व लिव्हरला धक्का पोचला नाही. अशी माहिती जखमी जवानाचे वडील सुका चव्हाण यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

आतापर्यंत साहेबराव चव्हाण यांच्यावर वैद्यकीय उपचारासाठी तीन लाख रुपये खर्च झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. परंतु येथून पुढील वैद्यकीय खर्च त्यांना पेलवणार नसल्याने जैताणे ग्रामपंचायतीतर्फे त्यांना बुधवारी (ता.1) सकाळी दहाच्या सुमारास 21 हजाराची औदार्यपूर्वक आर्थिक मदत देण्यात आली. सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, नवल खैरनार, सुरेश सोनवणे, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे आदींच्या हस्ते एकवीस हजाराच्या आर्थिक मदतीचा धनादेश जखमी जवानाचे वडील सुका बुधा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल...
प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी जवानाला पुढील उपचारार्थ नुकतेच धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती सुका बुधा चव्हाण यांचे ते सुपुत्र आहेत. जखमी जवान साहेबराव चव्हाण यांची सुमारे 12 वर्षे सेवा झाली असून ते गेल्या अडीच महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी भागात बंदोबस्तासाठी तैनात होते. परंतु त्यांच्यावरील नक्षलवादी हल्ल्याने त्यांचे कुटुंबीय पुरते भयभीत झाले आहेत. आई-वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. सुका चव्हाण यांनी जैताणे ग्रामपंचायतीचे आर्थिक मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत.

Web Title: jaitane grampanchayat helps injured army man