तब्बल दहा वर्षानंतर मिळाली जैताणे ग्रामीण रुग्णालयास निर्विवाद जागा

dhule
dhule

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील जून 2008 मध्ये मंजूर झालेल्या व सद्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीतच सुरू असलेल्या ग्रामीण रुग्णालयांच्या पर्यायी जागेचा मार्ग गुरुवारी (ता.6) तब्बल दहा वर्षांनी मोकळा झाला. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे व उपजिल्हाधिकारी (प्रशासन) राजेंद्रकुमार पाटील यांच्या सहीने खारीखाणमधील पर्यायी 2 हेक्टर जागेला मंजुरी मिळाली. जैताणे ग्रामपंचायत व वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांच्या प्रयत्नांना यश आले असून गेल्या दहा वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाचा कोट्यवधी रुपयांचा मंजूर निधी केवळ निर्विवाद जागेअभावी परत जात होता.

न्यायालयीन स्थगितीमुळे विलंब
गट क्रमांक 92 मधील जागेला असलेल्या न्यायालयीन स्थगितीमुळे गेल्या दहा वर्षांपासून हे ग्रामीण रुग्णालयाचे भिजत घोंगडे पडून होते. अखेर 26 जानेवारी 2018 च्या ग्रामसभेत पर्यायी जागेचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर जागेचा तिढा सुटला. सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र कोठावदे सूचक, तर ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार अनुमोदक होते. 2 फेब्रुवारीला वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षवर्धन चित्तम यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह खारीखाणमधील जैताणे गावठाणची गट क्रमांक 654/1 च्या पर्यायी पाच एकर जागेची पाहणी केल्यानंतर तेथील बेघरांच्या पश्चिमेकडील जागा निश्चित करण्यात आली होती.

परिसरातील लाखो रुग्णांना लाभ
जैताणे ग्रामीण रुग्णालयामुळे माळमाथा परिसरातील जैताणे, दुसाणे, छडवेल, नवापाडा, कळंभीर आदी पाचही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे 100 खेड्या-पाड्यांतील लाखो गोरगरिबांना याचा लाभ होणार असून अजूनही अपुऱ्या वैद्यकीय सुविधां अभावी रुग्णांना पुढील उपचारासाठी साक्री, धुळे, नंदुरबार याठिकाणी घेऊन जावे लागते. त्यामुळे अनेकदा रस्त्यातच रुग्ण दगावल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत.

30 खाटा व 25 कर्मचाऱ्यांचा कृती आराखडा मंजूर
ग्रामीण रुग्णालयासाठी किमान 30खाटा व 25कर्मचाऱ्यांचा कृती आराखडा मंजूर असून त्यात वैद्यकीय अधिक्षकांसह तज्ञ शल्यचिकित्सक, भुलतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आदी किमान चार तज्ञ डॉक्टरांसह नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. एक्स-रे, रक्त, लघवी, थुंकी तपासणी, कुपोषित बालकांवर उपचार, कुटुंबनियोजन, नसबंदी शस्त्रक्रिया, सिझेरियन, एचआयव्ही टेस्ट, विषबाधा व सर्पदंश, अपघात, क्षयरोग आदींबाबत सुविधा व उपाययोजना उपलब्ध होतील. रुग्णकल्याण समितीमार्फत जमा होणारा निधी रुग्णांसाठी तिथेच खर्ची टाकता येईल.

पर्यायी जागेच्या फाईलीचा सात महिन्यांचा प्रवास
खारीखाणमधील जैताणे गावठाणच्या पाच एकर जागेचा ग्रामपंचायतीचा ठराव दोन फेब्रुवारीला वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षवर्धन चित्तम यांच्याकडे सादर केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांमार्फत संबंधित प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने दाखल केला होता. आरोग्य विभागाने श्री.चव्हाण नामक कर्मचाऱ्याकडे कागदोपत्री पाठपुरावा करण्याचे काम सोपविले होते. तर महसूल शाखेचे कर्मचारी श्री.बाविस्कर यांचेही अनमोल सहकार्य लाभले. सुमारे सात विभागांचा नाहरकत दाखला मिळाल्यानंतर सात महिन्यांनी जागेला हिरवा कंदील मिळाला.

गावापासून हाकेच्या अंतरावर
ग्रामीण रुग्णालयासाठीची खारीखाणमधील ही पर्यायी जागा निजामपूर-जैताणेपासून लामकानी, दोंडाईचा रोडवरील हाकेच्या अंतरावर आहे. सरवड-कोंडाईबारी राज्य महामार्ग मंजूर झाल्यामुळे भविष्यात धुळे येथे जाताना नागरिकांचा वेळही वाचणार आहे. आठवडाभरात कागदोपत्री सोपस्कार पार पडल्यानंतर येत्या काळात ग्रामीण रुग्णालयाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. 

ग्रामपंचायत सदस्यांचा पाठपुरावा
सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पगारे, ईश्वर न्याहळदे, शानाभाऊ बच्छाव, नवल खैरनार, गणेश देवरे, दादा भिल, प्रमिलाबाई जाधव, मनीषा बागुल, छाया कोठावदे, रेवाबाई न्याहळदे, सुरेखा बोरसे, इंदूबाई खलाणे, पुष्पाबाई गवळे, आशा सोनवणे, सुरेखा भिल आदी सर्व सतरा सदस्यांसह माजी ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे, विद्यमान ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे आदींनी विशेष प्रयत्न केले.

"याबाबत माजी मंत्री तथा आमदार डॉ.विजयकुमार गावीत, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डी.एस.अहिरे, आमदार अमरिशभाई पटेल, धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते आदी लोकप्रतिनिधींसह इंजि.मोहन सूर्यवंशी यांनी अनमोल सहकार्य केले."
- संजय वेडू खैरनार, मावळते सरपंच, जैताणे ग्रामपंचायत.

"जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यांसह धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील आमदार, खासदार, मंत्री, पालकमंत्री आदी लोकप्रतिनिधींनी शासनाला यासंदर्भात शिफारसपत्रे दिल्यास ताबडतोब निधी मंजूर होऊन ग्रामीण रुग्णालयाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होईल. जैताणे ग्रामीण रुग्णालय साकार झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र खुडाणे येथे स्थलांतरित होणार आहे."
- डॉ.हर्षवर्धन चित्तम, वैद्यकीय अधीक्षक, जैताणे ग्रामीण रुग्णालय, वर्ग-१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com