ऑटोरिक्षा, टॅक्‍सीला मिळणार नवे परवाने 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

जळगाव - परिवहन विभागाने 1997 च्या अध्यादेशानुसार घातलेली ऑटोरिक्षा, टॅक्‍सीच्या नव्या परवान्यांवरील बंदी शासनाच्या अधिसूचनेनुसार मागे घेतली असून, रिक्षा, टॅक्‍सीला नवे परवाने जारी करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. याबाबत परिवहन विभागाच्या अपर आयुक्तांचे आदेश नुकतेच संबंधित यंत्रणेला पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे नव्याने रिक्षा, टॅक्‍सी घेणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

जळगाव - परिवहन विभागाने 1997 च्या अध्यादेशानुसार घातलेली ऑटोरिक्षा, टॅक्‍सीच्या नव्या परवान्यांवरील बंदी शासनाच्या अधिसूचनेनुसार मागे घेतली असून, रिक्षा, टॅक्‍सीला नवे परवाने जारी करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. याबाबत परिवहन विभागाच्या अपर आयुक्तांचे आदेश नुकतेच संबंधित यंत्रणेला पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे नव्याने रिक्षा, टॅक्‍सी घेणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

तत्कालीन शासनाने 26 नोव्हेंबर 1997 च्या निर्णयानुसार राज्यभरात ऑटोरिक्षा, टॅक्‍सीला नव्याने परवाने देण्यावर बंदी घातली होती. यादरम्यान रिक्षाचालक संघटना व काही संस्थांनी शासन निर्णयाच्या विरोधात विविध स्तरांवर पाठपुरावा केला. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. अखेरीस शहरातील गणेश ढेंगे यांनी यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात दोन वेळा याचिका दाखल केल्या. त्यावर दीर्घकाळ सुनावणी चालली. न्यायालयाने रिक्षाचालक, मालकांच्या बाजूने निर्णय देत ही बंदी हटविण्यासंदर्भात निर्देश दिले. त्यानंतरही वर्षभर शासनाने याबाबत अधिसूचना जारी केली नाही. अखेरीस खंडपीठाच्या आदेशाचा दाखला देत, त्यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर शासनाने अधिसूचना जारी करीत नव्या परवान्यांवरील बंदी मागे घेतली आहे. 

परिवहन आयुक्तांचे आदेश 
दरम्यान, परिवहन अपर आयुक्त सतीश सहस्रबुद्धे यांनी शासन अधिसूचनेचा दाखला देत राज्यातील सर्व भागांमध्ये ऑटोरिक्षा, टॅक्‍सीला नव्याने परवाने जारी करण्याच्या सूचना सर्व प्रादेशिक तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे रिक्षा, टॅक्‍सीचालकांना दिलासा मिळाला असून, यानिमित्ताने नवीन रिक्षा, टॅक्‍सी रस्त्यावर दिसणार आहेत. 

एका दिवसात मिळणार परवाना 
परिवहन आयुक्तांनी आदेश जारी करताना नव्या परवान्यासाठी संबंधित रिक्षा, टॅक्‍सीचालकाने दुपारी एकपर्यंत विहित नमुन्यात आवश्‍यक कागदपत्रांसह अर्ज करावा, सर्व पूर्तता करावी. त्यानंतर लगेच त्याच दिवशी त्यास परवाना देण्याचेही आदेशात म्हटले आहे. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या स्वरूपात ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. 

जिल्ह्यात 13 हजार 700 रिक्षा 
एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे 13 हजार 700 परवानाधारक अधिकृत ऑटोरिक्षा आहेत; तर सुमारे चार-पाच हजार अनधिकृत म्हणजेच परवाना नसलेल्या रिक्षा रस्त्यांवर धावतात. आता रिक्षांच्या या संख्येत भर पडणार आहे. 

परिवहन आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी तातडीने केली जाईल. या आदेशामुळे अनेक नवीन रिक्षा, टॅक्‍सी प्रवाशांना उपलब्ध होणार असून, चांगली सेवा यानिमित्ताने मिळणार आहे.  
- जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव 

Web Title: jalgano news autorickshaw taxi