जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे ‘ग्रहण’ फिटेना

पाळधी (ता. जामनेर) - जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे बंद असलेले काम.
पाळधी (ता. जामनेर) - जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे बंद असलेले काम.

पाळधी (ता. जामनेर) - जळगाव-औरंगाबाद महामार्गाचे काम आधीच कासवगतीने सुरू आहे. विविध कारणांनी खोळंबा होत असलेल्या या कामावर आता अभियंता, सुपरवायझरचे वेतन आणि मजुरांची मजुरी मिळत नसल्याने आज सकाळी कामबंद आंदोलन करण्यात आले. पाळधीकडून नेरी-जळगावकडे येत असलेल्या कामासाठीचा निधी उपलब्ध न झाल्याने ठेकेदाराला वेतन देणे अशक्‍य झाल्याची चर्चा असून, संतप्त मजुरांनी आज ठेकेदाराच्या सुनसगाव येथील कार्यालयावर धडक देऊन पगाराच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. आजवरचे वेतन मिळाल्यावर काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार, जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. काम सुरू झाल्या पासून कासवगतीने होत असलेल्या या कामामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

महामार्ग काँक्रीटीकरणावरील जवळपास शंभर मजुरांना मागील चार-पाच महिन्यापासून मजुरीच मिळत नसल्याने काम बंद करीत कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत कामावर येणार नाही असा एकमुखी निर्णय मजुरांनी घेतला आहे. घरदार गाव सोडून कामावर आलेल्या कामगारांना वेळीच वेतन मिळत नसल्याने  अभियंता, सुपरवायझर, वाहन चालक, रोलर चालक, गवंडी मजूर तसेच इतर मजुरीची कामे करणाऱ्यांच्या परिवाराची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक वेळेस मागणी करून सुद्धा पगार मिळत नसल्याने शेवटी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. 

ग्रामस्थांतही नाराजी 
ऋतिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सूनसगाव (ता. जामनेर) येथील कार्यालयासमोर कामावरील सुपरवायझर व मजुरांनी ठिय्या आंदोलन केले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्चाचे काम असताना ठेकेदाराकडून मजुरांचे वेतन दिले जात नसल्याचे आज उघडकीस आल्याने अगोदरच कामाच्या गतीमुळे त्रासलेल्या ग्रामस्थांनी काम बंद झाल्याने नाराजीचा सुर आवळला आहे. 

रस्त्याच्या कामासाठी कुठलाही निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. मजुरांना वेळेवर पगार देता येऊ शकत नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवरून नियोजन केले जात असून, १० फेब्रुवारीला सर्व मजुरांचे पगार दिले जातील. 
- किरण चौधरी प्रोजेक्‍ट मॅनेजर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com