आदिवासी पाड्यांतील गरजूंना अन्न, कपडे वाटप 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

हे मानवी जीवन त्रिमित आहे. या संपूर्ण विश्वात आपल्या जीवनाइतके दुसरे महत्त्वाचे काहीही नाही. जीवनाला लांबी (वय), रुंदी (प्रकृती) आणि खोली (इतरांसाठी तुम्ही काय केले) आहे. माणसाचे खरे मोठेपण या तिसऱ्या मितीवर ठरते. 
- हेमंत कसरेकर (अध्यक्ष, सद्‌गुरू सेवा मंडळ) 

जळगाव : मनुष्य जर सत्प्रवृत्त असेल, निदान त्याच्यातील कृतज्ञतेची भावना मारली गेली नसेल, तर इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना वाढीस लागते. याच आशयाने जळगावातील सद्‌गुरू सेवा मंडळाच्या वतीने प्रज्वलित करण्यात आलेला सेवाकार्याचा दीप अखंडितपणे तेवत आहे. 
"कपड्यांचे दान, गरिबांसाठी वरदान' या उक्तीनुसार मंडळातर्फे जळगाव जिल्ह्यातील चोपडा, रावेर परिसरात तसेच धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील वडफळी, मातासर यांसारख्या आदिवासी पाडा असलेल्या स्थळी गरजूंना अन्नदान, कपडे वाटप, जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप आदींच्या माध्यमातून कोणत्याही अपेक्षेशिवाय व कार्याचा बोलबाला न करता अविरत सुरू आहे. केवळ मानवतेच्या हितासाठी तसेच तळागाळातील उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंडळ कटिबद्ध असून, विधायक कार्याच्या अंमलबजावणीतून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या सोबतच सामाजिक परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या उपक्रमाद्वारे प्रबोधनाचे कार्य मंडळाच्या वतीने सुरू आहे. 
सद्‌गुरू सेवा मंडळाच्या माध्यमातून सध्या सद्‌गुरू भक्तराज महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष हेमंत कसरेकर (रा. कांदळी) यांच्या प्रेरणेतून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मंडळाचे सचिव जगदीश तळेले, बालविश्व इंग्लिश स्कूलच्या संचालिका भारती चौधरी, संदीप चौधरी, श्‍यामकांत पंडित, जयंत पळशीकर आदींच्या माध्यमातून सदस्यांच्या वतीने उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येत आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news aadivashi pada people dress distribute