पोषण आहारातील आणखी एक घोळ

पोषण आहारातील आणखी एक घोळ

जळगाव : शालेय पोषण आहार प्रकरणात आणखी एक घोळ समोर आला आहे. पुरवठादाराकडून बाजारभावापेक्षा दुप्पटीने मसाले पदार्थ पुरवठा करत आहे. विशेष म्हणजे पुरवठादाराकडून "गुणिना' या मार्केटमध्ये नसलेल्या कंपनीच्या नावाने तयार केलेले मसाले पदार्थ पुरवठा करत आहे. 

शाळेत जाणाऱ्या मुलांना आहार देवून तंदुरुस्त बनविण्याऐवजी ठेकेदारांचे पोषण करणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेचे दररोज नवनवीन घोळ समोर येत आहेत. जिल्ह्यातील पोषण आहार प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. प्रत्येकवेळी नवीन गोंधळ समोर येत असतो. गेल्या महिन्यात धान्यादी मालाच्या वजनात घट आढळून आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच आता पुरवठादाराकडून बाजारभावापेक्षा दुप्पट दराने मसाले पदार्थ वितरित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

तरीही ठेकेदाराला अभय 
जिल्ह्यात पोषण आहार पुरवठादाराकडून मनमानी कारभार सुरू आहे. यावर अंकुश बसविणे प्रशासनाला देखील अद्याप जमलेले नाही. मागील महिन्यात तांदूळ पुरवठ्यात 50 किलोच्या कट्ट्यामागे 10-15 किलो कमी तांदूळ पुरवठा केला जात असल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी चौकशी करून गटविकास अधिकारी यांनी अहवाल दिला आहे. अहवालात पुरवठादार दोषी आढळून आले असून ते कारवाईस पात्र आहेत. मात्र अद्यापही पुरवठादारावर गुन्हा दाखल झालेला नाही. 
र 
अटीशर्तींचे वारंवार उल्लंघन 
बाजारपेठेत असलेल्या दरापेक्षा पुरवठादारांना मंजूर करण्यात आलेले दर दुप्पट असल्याने शिक्षण विभागाकडून शासकीय निधीचा अपव्यय केला जात आहे. पोषण आहार पुरवठ्याच्या करारातील नियम आणि अटीशर्तींचे पुरवठादाराकडून पालन होत नसल्याचे अनेकदा उघड झाले आहे. यावरून पुरवठादाराकडून कोणत्याही नियम आणि अटींचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. 

नागपूर- पुण्यालाही दर कमी 
गुणिना कमर्शिअल कंपनी उत्पादित मसाले पदार्थांचे दर बाजारातील मसाले पदार्थांच्या दुप्पट आहे. नागपूर आणि पुणे येथील पोषण आहारासाठी मसाले पदार्थ वितरकांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या दरापेक्षा गुणिना कंपनीचे दर दुप्पट असल्याचे दिसून आले. गुणिनाकडून मिरची पावडर, लसूण-कांदा मसाला आणि हळद प्रतिकिलो 191 रुपये, जिरा 258, मोहरी 48 रुपये दराने वितरित केले जात आहे. दुसरीकडे बाजारात या मसाल्याचे दर मिरची पावडर प्रतिकिलो 90 ते 110 रुपये, लसूण-कांदा 100 ते 104, हळद 80 ते 100, जिरा 175, मोहरी 56 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. नागपूर- पुणे येथील काही पुरवठादार याच दराने मसाले पदार्थ विक्री करत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com