मनसेने पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घातला गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

"मनसे'चे जिल्हाध्यक्ष ऍड.जमिल देशपांडे, शाहीद मेंबर आदींच्या जमावाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोमवारी तब्बल अर्धा ते पाऊण तास गोंधळ घातला.

जळगाव ः रेशन कार्ड नसले तरी त्यांना रेशनमधील धान्य द्यावे, रेरेशन कार्ड धारकांची नावे काढून दुसऱ्या दुकानांना जोडा आदी मागणी करीत "मनसे'चे जिल्हाध्यक्ष ऍड.जमिल देशपांडे, शाहीद मेंबर आदींच्या जमावाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सोमवारी तब्बल अर्धा ते पाऊण तास गोंधळ घातला. पोलिसांना पाचारण केल्यानंतर गोंधळ मिटला. 

जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्याकडे मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड.जमिल देशपांडे, शाहीद मेंबर व काही बांधव, महिलांना घेऊन गेले. रेशन दुकानदार रिटा विनोद सपकाळे हे गरिबांना धान्य देत नाहीत, दुकान बंद ठेवतात, त्यांच्याकडील नागरिकांची रेशनकार्डे काढून दुसऱ्या दुकानांशी आताच जोडा, लागलीच काम करा, असे मोठमोठ्याने ओरडत श्री.सूर्यवंशी यांच्यावर धावून गेले. श्री.सूर्यवंशी यांनी देशपांडे व इतरांना सांगितले, की अशा प्रकारे गोंधळ घालून चालणार नाही. जे नियमात आहे त्याप्रमाणे धान्य वाटप होईल. त्यावर रेशन दुकानदार म्हणाले, यांच्याकडे रेशनकार्ड नाही तरी धान्य मागितले जाते. त्यावर देशपांडे रेशनकार्ड नसले म्हणून काय झाले, त्यांना धान्य द्यावेच लागेल, आताच हे काम करा. असा गोंधळ घातला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस पुरवठा अधिकाऱ्यांकडे आले. दरम्यान पुरवठा अधिकाऱ्यांकडे बसलेले रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल व इतर दुकानदारांनी देशपांडे व गोंधळ घालणाऱ्यांना समजावीत गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न केला. 

आर्वजून पहा : दोन दिवस "ती' होती बेपत्ता...तिसऱ्या दिवशी सापडली रेल्वे ट्रॅकवर 

अन्‌ आले पोलिस... 
पोलिस येताच गोंधळ करणारे श्री.सूर्यवंशी यांच्या कार्यालयातून बाहेर गेले. पोलिसांनी गोंधळ करणाऱ्यांची कान उघाडणी करीत श्री.सूर्यवंशी यांची माफी मागण्यास सांगितली, नंतर गोंधळ घालणाऱ्यांना माफी मागितली. यामुळे पोलिसांत तक्रार देण्यात आली नाही. अन्यथा गोंधळ घालणाऱ्यांवर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदविला गेला असता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news manse District President District Supply Officer gondhal