जळगाव जिल्ह्यातील 361 रेशन दुकानदारांची अनामत जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

मुदतीत शिधा पत्रिका धारकांना अन्नधान्य वाटप न करणाऱ्या जिल्ह्यातील 361 स्वस्त धान्य दुकानदारांची अनामत रक्कम पुरवठा विभागाने जप्त केली.

जळगाव : शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत शिधा पत्रिका धारकांना अन्नधान्य वाटप न करणाऱ्या जिल्ह्यातील 361 स्वस्त धान्य दुकानदारांची अनामत रक्कम पुरवठा विभागाने जप्त केली. यामध्ये सर्वाधिक 101 दुकानदार जळगाव तालुक्‍यातील आहे. जिल्ह्यात सहा लाख रुपयांची अनामत जप्त झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या सूचनेनंतरही अन्न दिन साजरा होत नसल्याचे लक्षात आल्याने ही कारवाई करण्यात आली. 

जिल्ह्यातील पुरवठा विभागाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी पुरवठा विभागाची बैठक झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील गोदामपाल, पुरवठा निरीक्षण अधिकारी, पुरवठा निरीक्षक, पुरवठा अव्वल कारकून यावेळी उपस्थित होते. 

नक्की पहा : आहो हे काय..."हग डे' ला पोलिसांनी मारली मिठी...! 
 

शासकीय धान्यापासून कोणीही वंचित राहू नये व ते वेळेत वाटप व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत दुकानदारांनी स्वस्त धान्याची उचल करावी व 14 तारखेपर्यंत संपूर्ण वाटप करावे, असे ठरवून देण्यात आले. त्यात 7 तारीख ही अन्नदिन म्हणून साजरा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिल्या होत्या. या सर्वांचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील 361 स्वस्त धान्य दुकानदारांनी ठरवून दिलेल्या मुदतीत धान्याचे वाटप केले नाही. त्यामुळे या दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी दिल्या. त्यानुसार पुरवठा अधिकारी सूर्यवंशी यांनी या दुकानदारांची अनामत रक्कम जप्त केली. यामध्ये जळगावसाठी एकेका दुकानदाराची प्रत्येकी तीन हजार रुपये तर इतर तालुक्‍यातील दुकानदारांची प्रत्येकी एक हजार रुपये अनामत रक्कम आहे. त्यानुसार या 361 दुकानदारांची अनामत रक्कम व दंडाची पावती अशी सुमारे सहा लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

आर्वजून पहा : जिल्ह्यातून चार लाख क्विंटल केळीची होणार निर्यात
 

जिल्ह्यातील अन्नदिन साजरा न करणाऱ्या 361 दुकानदारांपैकी सर्वाधिक दुकानदार 101 जळगाव तालुक्‍यातील आहे. त्या खालोखाल भुसावळ व जामनेर तालुक्‍यातील प्रत्येकी 54 दुकानदारांचा यात समावेश आहे. सर्वांत कमी बोदवड तालुक्‍यातील 3 दुकानदारांचा समावेश आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news Reservation of 361 ration shopkeepers in Jalgaon district seized

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: