पंचवीस कोटींच्या निधीचे नियोजन पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग करण्यावरून वाद सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांकडून केवळ तोंडी ग्वाही मिळाल्यानंतर आता हा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचला असून त्याचे नियोजन करण्यासाठी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांकडे बैठक होण्याची शक्‍यता असून त्यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना निधीच्या ठरावासह सतर्क राहण्याचे आदेश आले आहेत.

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव शहराच्या विकासासाठी दिलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग करण्यावरून वाद सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांकडून केवळ तोंडी ग्वाही मिळाल्यानंतर आता हा वाद थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचला असून त्याचे नियोजन करण्यासाठी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांकडे बैठक होण्याची शक्‍यता असून त्यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांना निधीच्या ठरावासह सतर्क राहण्याचे आदेश आले आहेत.

जळगाव महापालिका कर्जबाजारी असल्यामुळे विकासासाठी निधी नसल्याने अनेक कामे ठप्प झाली होती. २० जून २०१५मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव येथे आले होते. त्यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन शहराच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तो जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केला होता.

मुख्यमंत्र्यांनी निधी दिला असला तरी त्याचा विनियोग करण्याबाबत सत्ताधारी खानदेश विकास आघाडी व विरोधी भाजपत वाद सुरू आहेत. त्यामुळे अडीच वर्षांपासून हा निधी पडून आहे. आताही या निधीतून कामाचे नियोजन करण्यात आले होते. त्याबाबत महासभेत ठराव मंजूर करण्यात आला होता. यात दहा कोटी रुपये रस्त्याच्या कामासाठी टाकून उर्वरित रकमेतून पथदिवे तसेच इतर नियोजन करण्यात आले होते. त्याबाबत अंतिम मसुदा करून तो नाशिक विभागीय आयुक्ताकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

प्रदेशाध्यक्षांची तोंडी ग्वाही 
भाजपचे नगरसेवक अद्यापही नाराज असल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना भेटून तक्रार केली आहे. भाजपच्या नगरसेवकांनी आपल्या प्रभागात निधीतून कोणतीही कामे नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन तक्रार केली होती. नगरसेवकांच्या प्रभागात कामे देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.भाजपच्या नगरसेवकांनी तक्रार केल्यामुळे रावसाहेब दानवे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे फडणवीस यांनी या निधीच्या विनियोगाबाबत महापालिका प्रशासनाकडून पुन्हा ठरावासह सर्व माहिती मागविण्याबाबत चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पंचवीस कोटीच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती मागविण्याची चर्चा केल्याने त्याबाबत नगरविकास विभाग अधिकाऱ्यांनी जळगाव महापालिका कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात आले. २५ कोटींच्या निधीच्या नियोजनाच्या ठरावासह सर्व माहिती मागविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात  आले.

२५ कोटींच्या निधीच्या विनियोगाबाबत माहिती देण्याचे नगरविकास विभागाचे अद्याप कोणतेही आदेश नाहीत. मात्र याबाबत चर्चा होण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी संपूर्ण माहितीसह सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
- राजेश कानडे,अप्पर आयुक्त, महापालिका, जळगाव

Web Title: jalgaon news 25 crore fund planning to chief minister