जळगाव बसस्थानक बनले चोरांचा अड्डा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

जळगाव बसस्थानक बनले चोरांचा अड्डा 

जळगाव बसस्थानक बनले चोरांचा अड्डा 

जळगावः येथील मध्यवर्ती बसस्थानकात मोबाईलचोर, पाकीटमार आणि भुरटेचोर यांचा वावर वाढला आहे. मात्र, तरीही पोलिस चौकीत थांबतच नसल्याने चोरट्यांनी जणू बसस्थानक ताब्यातच घेतल्याची स्थिती निर्माण झाली आहे. महिलांच्या पर्स, मंगळसूत्र, पाकिटे, मोबाईल आदींचे चोरटे रात्रंदिवस या परिसरात असताना पोलिसांना कधीच सापडत नाही. आज जामनेरला जाणाऱ्या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन चार विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरट्यांनी लांबविले. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. यापैकी एका विद्यार्थ्याला हा प्रकार लक्षात आल्याने त्याने संबंधित चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो हिसका देऊन पसार झाला. 
कुसुंबा (ता. जळगाव) येथील विद्यार्थी खासगी क्‍लाससाठी जळगावात ये-जा करतात. आज दुपारी एकला क्‍लास सुटल्यावर पुन्हा कुसुंब्याला जाण्यासाठी ते बसस्थानकात आले. तेथे जळगाव- जामनेर बस (एमएच 20- बीएल 3362) उभी होती. तिच्यात चढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली असता हा फायदा घेत चोरट्याने पाच-सहा विद्यार्थ्यांचे मोबाईल लांबविले. यावेळी चेतन संतोष पवार (रा. कुसुंबा) याला त्याचा मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यानेही सोबतच्या इतरांना आपापले मोबाईल आहेत का, याची खात्री करण्यास सांगितले असता इतरही चौघांचे मोबाईल चोरीस गेले होते. 

चोरटा एक मोबाईल फेकून देत पसार 
मोबाईलचा शोध घेताना चोरटा बसमध्येच होता. संशय आल्याने त्याच्याकडे सर्वांनी धाव घेतली. या तरुणाच्या खिशात तीन ते चार मोबाईल होते. विद्यार्थी विचारपूस करत असतानाच त्याने एक मोबाईल बसच्या चाकाजवळ फेकला. त्यानंतर विद्यार्थ्यांना हिसका देऊन तो गर्दीतून पसार झाला. फेकलेला मोबाईल विद्यार्थ्यांपैकी सुमित सुरेश सालकर (रा. कुसुंबा) याचा होता. 

पोलिसांकडून बसची तपासणी 
चोरटा पसार झाल्यानंतर विद्यार्थी बसमध्ये बसले. चेतन पवारने मित्राच्या मोबाईलवर त्याचे लोकेशन तपासले असता ते बसमध्येच दिसून येत होते. यावेळी त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्याजवळ बस थांबविली व प्रकार पोलिसांना कथन केला. एमआयडीसी पोलिसांनी अर्धातास बसमधील विद्यार्थ्यांसह प्रवाशांची तपासणी केली. मात्र, मोबाईल मिळून आला नाही. चेतन व त्याचा मित्र सुमित सालकर बसमधून उतरून तक्रार देण्यासाठी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गेले. यानंतर बस पुढच्या प्रवासाला रवाना झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news busstyan chortyanca aada