कृष्णापुरी धरणात अत्यल्प जलसाठा

दीपक कच्छवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

गिरणा धरणातून सोडलेले पाणी 15 मार्चपर्यत चालणार आहे.त्यानुसार लवकरच कृष्णापुरी धरणात पाणी सोडण्यासंदरभात वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल
- निलेश पाटील, साहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग चाळीसगाव

पिके धोक्‍यात; डाव्या कालव्याद्वारे "गिरणा'चे पाणी सोडण्याची मागणी

मेहुणबारे (ता. चाळीसगाव): वरखेडे (ता. चाळीसगाव) गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील कृष्णापुरी धरणात अवघा एक- दोन क्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी, परिसरातील पिकेही धोक्‍यात आली आहे. पाण्याअभावी होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी गिरणा धरणाचे पाणी पांझण डावा कालव्याद्वारे "कृष्णापुरी'त सोडावे, अशी मागणी होत आहे.

गिरणा धरणातून शेतीसाठी पांझण डावा कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, हे पाणी सद्यःस्थितीत खेडगाव, जुवार्डी, आडळसे या भागातील गावांतील शेतीसाठी मिळत आहे. डाव्या कालव्याची कळवाडी, दहिवद व मेहुणबारे अशा तीन भागात विभागणी केलेली आहे. गिरणा धरणाचा डावा कालवा सुमारे 53 किलोमीटरचा लांबीचा आहे. या कालव्याला पाणी सोडल्यानंतर सुमारे 12 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. या पाण्यापासून कृष्णापुरी धरण क्षेत्रातील शेतकरी नेहमीच वंचित राहतात.

कृष्णापुरी धरण भरावे
कृष्णापुरी धरणात पाणी नसल्याने लोंढे, वरखेडे, दरा तांडा, वरखेडे तांडा, लोंढे तांडा परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एकीकडे कृष्णापुरी धरणात पाणीसाठा नाही तर दुसरीकडे आजूबाजूच्या विहिरींची पातळी खालावत आहे. दहा तास चालणारे विद्युत पंप केवळ एक तास चालत आहेत. त्यामुळे कांदा, गहु, बाजरीसह ऊस व केळीचे पीक धोक्‍यात आले आहे. ज्यामुळे या भागातील शेतकरी हताश झाले आहेत. कृष्णापुरी धरणात गिरणा धरणाचे पाणी मिळाले, तर या भागातील चित्र बदलू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागीलवर्षी कृष्णापुरी धरणात पाणी सोडण्याचे आश्वासन पाटबंधारे विभागाने दिले होते. त्यानुसार, पाणी सोडले देखील. मात्र, प्रत्यक्षात हे पाणी प्रत्यक्ष कृष्णापुरी धरणात चारीद्वारे आले. मात्र, जेमतेम पाणी आल्याने त्याचा कोणालाच लाभ झाला नाही. अपेक्षित पाणी न मिळाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील उभी पिके सोडून दिली होती. अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. गिरणाच्या पाण्याचा लाभ होईल, या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे "गिरणा'चे पाणी "कृष्णापुरी'त सोडून शेतकऱ्याचे अश्रू पुसावेत, अशी मागणी होत आहे.

आमदारांनी दिले आश्वासन
कृष्णापुरी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात वरखेडे परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार उन्मेष पाटील यांची नुकतीच भेट घेतली होती. आमदार पाटील यांनी "कृष्णापुरी'त पाणी सोडण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी भ्र्रणध्वनीवरुन चर्चाही केली. त्याला अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला. मात्र, अद्याप तरी पाणी सोडलेले नाही. त्यामुळे वेळेत पाणी मिळाले नाही तर काहीच उपयोग होणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत आमदार उन्मेष पाटील यांनी दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

दहीवद धामणगावला आज मिळणार पाणी
पाटबंधारे विभागाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार आज दि 16 रोजी दुसर्‍या टप्यातील धामणगाव खडकीसिम व दहीवद या भागातील शेतकर्यानां रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून पाटचारीद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे.सोडण्यात येणारे पाणी वाया जाणार नाही.याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

Web Title: jalgaon news chalisgaon krishnapuri dam water