अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह; पालकांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

जळगाव - बालविवाहास कायद्याने बंदी असताना व शासनस्तरावरून जनजागृती केली जात असताना जळगावात चक्क सतरावर्षीय मुलगा आणि पंधरावर्षीय मुलीचा विवाह लावून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात पालकांसह नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जळगाव - बालविवाहास कायद्याने बंदी असताना व शासनस्तरावरून जनजागृती केली जात असताना जळगावात चक्क सतरावर्षीय मुलगा आणि पंधरावर्षीय मुलीचा विवाह लावून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात पालकांसह नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सीताबाई नाना सकट (रा. नवागाव, कैलासनगर, सुरत) व शीला राजू खलसे (रा. राजीव गांधीनगर) या महिलांनी आपल्या मुला-मुलीचे लग्न गुरुवारी (१४ सप्टेंबर) अमळनेर तालुक्‍यातील पातोंडा येथे लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर राजीव गांधीनगरात छोटेखानी कार्यक्रम झाला. परंतु सीताबाई सकट व शीला खलसे यांच्यात सोमवारी (१८ सप्टेंबर) जोरदार वाद झाल्याने दोन्ही कुटुंबांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली. वादाची चौकशी करीत असताना पोलिसांना वधू - वर हे अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्वरित नवरदेव व नवरीच्या जन्मतारखांची पडताळणी केली असता मुलाचे वय सतरा, तर मुलीचे पंधरा वर्षे असल्याचे आढळून आले. रामानंदनगर पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही कुटुंबातील नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

बालविवाहाचे पुरावे जप्त 
अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह लावून दिल्याचे निष्पन्न झाल्यावर या बालविवाहाची छायाचित्रेही मिळून आली आहेत. पोलिस नाईक विनोद जालंदर शिंदे यांच्या तक्रारीवरून शीला राजू खलसे, सुधाकर मधुकर नाडे, छारा सुधाकर नाडे (सर्व रा. राजीवगांधीनगर, सीताबाई नाना सकट, नाना सकट, भय्या नाना सकट, ज्ञानेश्‍वर नाना सकट, अरुण नाना सकट (रा. नवागाव कैलासनगर सुरत), तसेच पातोंडा येथील पंडित (भटजी) अशा नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार विजय निकुंभ तपास करीत आहेत.

Web Title: jalgaon news crime