दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ फुलली!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

जळगाव - साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला आज विविध वस्तू, सोने, आभूषणे, वस्त्रखरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलली होती. खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीमुळे तेथे उत्साह ओसंडून वाहत आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला प्रमुख बाजारपेठांमध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी दिसून आली.

विजयादशमीच्या पूर्वसंध्येला कपडे, मिठाई, झेंडूची फुले, पूजासाहित्य आदी वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानास व झेंडूच्या फुलांना महत्त्व आहे. त्याच्या खरेदीसाठी टॉवर चौक, गांधी मार्केट, फुले मार्केट, दाणाबाजार परिसरात ग्राहकांची गर्दी झाली होती. शहरात शिरसोली, नशिराबाद, असोदा, पाळधी व परिसरातील गावांतून मोठ्या प्रमाणावर झेंडूची फुले विक्रीसाठी आली आहेत. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी फुलांचे ढीग दिसून आले. याशिवाय, ऑटोमोबाइल शोरूम व इलेक्‍ट्रॉनिक मार्केटमध्येही गर्दी पाहण्यास मिळाली.

झेंडूची फुले खाताय भाव
दसऱ्याला झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असते. त्याअनुषंगाने झेंडूच्या फुलांची आवक सुरू झाली असून, फुलांचे दर गगनाला पोहोचले आहेत. आज दर ६० ते ७० रुपये किलोप्रमाणे विक्रीस होते. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता विक्रेत्यांनी वर्तविली. शहरात शिरसोली, पाचोरा आदी ठिकाणांहून येणाऱ्या झेंडूच्या फुलांचे प्रमाण यंदा कमी आहे.

सुवर्ण बाजारही फुलला
दसरा म्हणजे खरेदीचा सुवर्णमुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेली खरेदी लाभदायी मानली जाते. म्हणून या दिवशी नवीन वस्तू, वाहने व सोने खरेदीकडे अनेकांचा ओढा असतो. यामुळे जळगावनगरीतील सुवर्ण बाजारपेठेतील सोन्या- चांदीच्या दालनांमध्ये दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाही खरेदीसाठी गर्दी होती. उद्या खरेदी करणाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन सुवर्णपेढ्याही सज्ज झाल्या आहेत. शिवाय, कापडांची दुकानेही गर्दीने गजबजून गेली आहेत.

Web Title: jalgaon news dasara celebration