स्त्रीमुक्तीचा विचार घरातून सुरू व्हावा - प्रा. डॉ. अंजली आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

जळगाव - पुरुष समाजात पुरोगामी विचार घेऊन वावरतात. मात्र, घरात पारंपरिक पद्धतीने वागतात. स्त्री-मुक्तीचा विचार भारतीय संविधानाने समाजव्यवस्थेला दिला. हा विचार केवळ घोषणा किंवा जयजयकारापुरता मर्यादित न ठेवता प्रत्येकाने आपल्या घरातून रुजवावा, असे विचार प्रा. डॉ. अंजली मायदेव आंबेडकर यांनी आज (ता. 24) येथे व्यक्त केले.

येथील प्रगतिशील लेखक संघ, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जळगाव जिल्हा महिला असोसिएशन व समविचारी संघटनांतर्फे आयोजित सहाव्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात डॉ. अंजली आंबेडकर यांचे बीजभाषण झाले, त्याप्रसंगी त्यांनी हे विचार मांडले. कांताई सभागृहात झालेल्या या संमेलनात डॉ. आंबेडकरांचे विचार व साहित्यावर तज्ज्ञांकडून मंथन झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष साजिद शेख, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जळगाव जिल्हा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा राजकमल पाटील, प्रमुख संयोजक मुकुंद सपकाळे आदी उपस्थित होते.

डॉ. अंजली आंबेडकर म्हणाल्या, की संविधान सार्वभौम मानणारे, मी भारतीय असल्याची ओळख निर्माण करणारे स्त्री किंवा पुरुष प्रबुद्ध भारताचे खरे नागरिक आहेत. आजच्या चळवळीसुद्धा एक वर्तुळ झाल्या आहेत, त्या वर्तुळापलीकडे संघर्षाच्या आघाडीवर येणे आवश्‍यक आहे. जळगाव चळवळीची भूमी आहे. राजकीय, सामाईक आव्हानांच्या परिस्थितीत येथे संमेलने होत असून, विचारांच्या पातळीवर निर्माण झालेली आव्हाने मोडून काढण्यासाठी अधिक प्रयत्नाची गरज आहे.
उद्‌घाटन सत्राचे अध्यक्ष डॉ. जोशी म्हणाले, की आपण सारे आंबेडकर परिवार आहोत. देशाच्या पायाभरणीसाठी संविधान साक्षर चळवळ उभारण्याची आज गरज आहे. अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. वैशाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: jalgaon news dr. anjali ambedkar talking