शाळांची अपेक्षित गुणवत्ता सुधारणेसाठी ‘एक दिवस शाळेसाठी’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

जळगाव - जिल्हा परिषद शाळांची अपेक्षित असलेली शैक्षणिक गुणवत्ता पाहण्यास मिळत नाही. शिवाय विद्यार्थ्यांची हजेरी, शाळास्तरावरून कराव्या लागणाऱ्या नोंदी याबाबत माहिती घेणे आवश्‍यक झाले आहे. प्रामुख्याने शाळांची गुणवत्ता सुधारणेसाठी शाळांना भेटी देऊन आढावा घेण्यासाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.

जळगाव - जिल्हा परिषद शाळांची अपेक्षित असलेली शैक्षणिक गुणवत्ता पाहण्यास मिळत नाही. शिवाय विद्यार्थ्यांची हजेरी, शाळास्तरावरून कराव्या लागणाऱ्या नोंदी याबाबत माहिती घेणे आवश्‍यक झाले आहे. प्रामुख्याने शाळांची गुणवत्ता सुधारणेसाठी शाळांना भेटी देऊन आढावा घेण्यासाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी पांडेय यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या उपस्थितीसाठी स्ट्रॉम प्रणाली कार्यान्वित केली होती. राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला होता. यामुळे शाळांना काही प्रणामात शिस्त लागली होती. विद्यार्थी पटसंख्या सुधारण्यास देखील मदत मिळाली होती. ही प्रणाली आजही सुरू असून, याच पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष शाळांना भेटी देवून तेथील आढावा घेणे, तेथील परिस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने ‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे. याच पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाशी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांना देखील भेटी देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले.

अधिकारीच जाणार भेटीला
जिल्हा परिषद शाळांना भेटी देण्यासाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाला ऑक्‍टोबरपासून सुरवात करण्यात येणार असून, प्रत्येक शाळेच्या भेटीसाठी दिवस निश्‍चित केला जाणार आहे. याकरिता जिल्हा परिषदेतील अधिकारी, शिक्षणाधिकारी किंवा गटविकास अधिकाऱ्यांना भेटीसाठी पाठविण्यात येणार आहे. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांची आधारकार्ड नोंदणी, पटपडताळणी, शाळा सिद्धीसाठीची माहिती, गुणवत्ता याबाबतची माहिती घेतली जाणार आहे. त्यात काही कमतरता असल्यास त्या दृष्टीने निर्णय घेण्याचे काम याद्वारे केले जाणार आहे.

कर्मचारी हजेरीसाठी ‘थम्ब मशिन’
जिल्हा परिषदेत विभाग प्रमुख नसल्यास जवळपास सर्वच विभागामधील कर्मचारी दुपारी चारनंतर गायब होत असतात. परिणामी संपूर्ण जिल्हा परिषद रिकामी होत असल्याचा अनुभव गेल्या दोन आठवड्यांपासून येत आहे. यावर नियंत्रण मिळविणे आणि कर्मचारी हजेरीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना थम्प मशिन आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. थम्प मशीनसाठी कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक मागविण्यात येत असून, साधारण महिनाभरात हे मशिन कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेगावकर यांनी सांगितले. तसेच गटविकास अधिकारी कार्यालयांमध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

Web Title: jalgaon news ek divas shalesathi