रामानंदनगरातील मुलीवर जंगलात नेऊन अत्याचार

रामानंदनगरातील मुलीवर जंगलात नेऊन अत्याचार

जळगाव - शहरातील रामानंदनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या पंधरा वर्षीय शाळकरी मुलीशी फेसबुकच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळवून पहिल्याच भेटीत संबंधित तरुणाने या मुलीवर अत्याचार केल्याची घटना महिनाभरापूर्वी घडली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागील जंगलात नेऊन त्याने अत्याचार केल्याची नोंद करण्यात आली आहे. पीडित मुलगी तणावात असताना संशयिताने तिच्या वडिलांच्या मोबाईलवर अश्‍लील फोटो पाठवून ब्लॅकमेलिंग सुरू केल्याने अखेर महिन्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून आज पाळधी औट पोस्टला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याच मुलीच्या एका मैत्रिणीसोबतही या भामट्याने फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करीत असेच कृत्य केल्याचे समोर आले आहे. 

जळगाव शहरातील रामानंदनगर परिसरातील पंधरा वर्षीय निर्भयाची (काल्पनिक नाव) फेसबुकवर समर (काल्पनिक नाव) या तरुणाशी मैत्री झाली. मैत्रीनंतर दोघांची नियमित फेसबुक चॅटिंग सुरू होती. त्यातून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अल्पवयीन निर्भयाला कसलीच कल्पना नसताना समरने गेल्या २ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या मागील टाकरखेडा जंगलात नेऊन भरदुपारी अडीच वाजता जबरदस्ती अत्याचार केला. 

पीडित मुलीने घडला प्रकार निमूटपणे सहन केल्यावर काही दिवसांनी या भामट्याने पीडितेच्या वडिलांच्या मोबाईलवर अश्‍लील फोटो पाठवून पुन्हा संपर्क साधला. ‘तुझ्या एखाद्या मैत्रिणीसोबत संबंध जुळवून दे... अन्यथा तुझे फोटो आणि अश्‍लील व्हिडिओ व्हॉटस्‌ॲप, फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल करणार’, अशी धमकी या भामट्याने दिली. भेदरलेल्या तरुणीने घडला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या फिर्यादीवरून पाळधी औटपोस्टला या अनोळखी तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिस उपनिरीक्षक जगदीश मोरे, पोलिस नाईक किरण धनगर हे तपास करीत आहेत. पीडित मुलगी सामान्य नोकरदार कुटुंबातील असून, घडल्या प्रकाराने हे संपूर्ण कुटुंब भेदरले आहे. संशयिताला शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून, तो लवकरच गजाआड होईल असे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ब्लॅकमेल करणारा ‘फेसबुक फ्रेंड’ समर याने अन्य फेसबुक फ्रेंड मुलींचेही शोषण केल्याचे समोर आले आहे. 

सीडी पोलिसांच्या ताब्यात
पोलिस उपनिरीक्षक जगदीश मोरे, किरण धनगर यांनी तपासात पीडित तरुणीशी मोबाईलवर झालेले संभाषण, संशयिताने पाठविलेल्या फोटोसह इतर आवश्‍यक पुरावे सीडीत संकलित केले आहेत. आज दुपारी १२.३० ते ३.३० दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, संशयिताचा शोध घेण्यात येत आहे. तपासाअंती सायबर क्राइमचे वाढीव कलम गुन्ह्यात लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com