'गिरणा'च्या साठ्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित!

शिवनंदन बाविस्कर
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

धरणातील साठ्याबाबत अगोदरच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. सद्यःस्थितीत शेतीसाठी किती आवर्तने मिळतील? हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे कालवा समितीच्या बैठकीनंतर किती पाणी द्यायचे, हे ठरेल.
- एस. आर. पाटील, शाखा अभियंता, गिरणा धरण.

पिलखोड(ता. चाळीसगाव) : निम्म्या जिल्हावासीयांची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा साठा यंदा 72 टक्क्यांवर स्थिर झाला आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शिवाय सिंचनासाठी किती आवर्तने मिळतील, हे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.

गतवर्षी गिरणा धरण साडेनव्वद टक्के भरले होते. त्यात शेतकऱ्यांना रब्बीसाठी तीन आवर्तने मिळाली होती. शिवाय वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली होती. यंदा देखील धरणाच्या साठ्यात चांगली वाढ झाली. धरण शंभर टक्के भरेल, अशी अपेक्षा असतांना धरणसाठा 72 टक्क्यांवर स्थिर झाला आहे. यामुळे निम्म्या जिल्हावासीयांची पिण्याच्या पाण्यासाठी चिंता मिटली आहे. सध्या धरणात एकुण  16 हजार 268 दशलक्ष घनफुट पाणीसाठा असून 13 हजार 268 दशलक्ष घनफुट जिवंत साठा उपलब्ध असल्याची माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. 

सिंचनासाठी आवर्तन?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्वच धरणातील साठे सद्यःस्थितीत आरक्षित करण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते. सर्व परिस्थिती बघता सिंचनासाठी एक आवर्तन मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर रब्बीसाठी किती आवर्तने द्यायचे हे अधिक स्पष्ट होईल. असे धरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मन्याड 63 टक्के.....
गतवर्षी परतीच्या पावसाने शंभर टक्के भरुन ओसंडून वाहणारे मन्याड धरण यंदा मात्र 63 टक्क्यांवर स्थिर झाले आहे. अशी माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता हेमंत पाटील यांनी 'सकाळ'ला दिली. यंदा धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला. शिवाय परतीच्या पावसाने तरी धरण भरेल अशी अपेक्षा असतांना धरण शंभर टक्के भरु शकले नाही. दरम्यान धरणावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबुन असणाऱ्या गावांची चिंता मिटली आहे. शेतीसाठी आवर्तन मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे.

धरणावर चार पाणीपुरवठा योजना....
पिण्याच्या पाण्यासाठी गिरणा धरणातून सद्यःस्थितीत मालेगाव महानगरपालिका, चाळीसगाव नगरपालिका, नांदगाव नगरपालिका व दहिवाळ गाव अशा चार पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. तर गिरणा नदीवर जळगावपर्यंत भडगाव नगरपालिका, पाचोरा नगरपालिका यांच्यासह 125 ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबुन आहेत.

धरणातील साठ्याबाबत अगोदरच पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. सद्यःस्थितीत शेतीसाठी किती आवर्तने मिळतील? हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे कालवा समितीच्या बैठकीनंतर किती पाणी द्यायचे, हे ठरेल.
- एस. आर. पाटील, शाखा अभियंता, गिरणा धरण.

Web Title: Jalgaon news girna dam storage