चौपदरीकरणामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

जळगाव - राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास सुरवात झाली आहे. यामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून, उद्योगांसाठी पूरक असे वातावरण तयार होईल. माल वाहतुकीची मोठी सोय होणार आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

जळगाव - राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास सुरवात झाली आहे. यामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून, उद्योगांसाठी पूरक असे वातावरण तयार होईल. माल वाहतुकीची मोठी सोय होणार आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी प्राप्त होण्यास मदत होणार आहे.

फागणे ते तरसोद महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास पारोळ्यापासून सुरवात झाली आहे. तरसोद ते चिखली काम सुरू करण्यासाठी कॅम्पची उभारणी सुरू आहे. चौपदरीकरणामुळे उद्योगांना आवश्‍यक असणारी दळणवळणासाठी रस्ते उपलब्ध होणार आहे. जळगाव जिल्ह्यात दळणवळणाच्या सोयी आहेत. मात्र महामार्गावर ट्रॅफिक जामची समस्या आहे. महामार्गाच्या चौपदीकरणाने ती दूर होऊन कमी वेळेत अधिक अंतर पार करणे शक्‍य होणार आहे.

चौपदरीकरणासाठी भूसंपादनाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले. दुसरीकडे कामांना सुरवात झाली. त्यामुळे चौपदरीकरणात ज्या जागा मोक्‍याची ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी अनेकांनी जागा घेऊन त्यावर विविध प्रकारच्या हॉटेल्स, बिअरबार, रिसॉर्ट, लान्स, फ्लॅटसाठी जागा घेण्यास सुरवात केली आहे.

त्यातून भविष्यात अनेक जणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहे. अनेक भाग असे आहे जिथे केवळ रस्ते नसल्याने त्या भागाचा सर्वांगीण विकास झालेला नाही. तो आता चौपदरीकरणामुळे होण्यास मदत होणार आहे. 

उद्योग, व्यापारात वृद्धी
चौपदरीकरणामुळे जिल्ह्यात अनेक भागातील एमआयडीसीमध्ये मुंबई, पुणे, परराज्यातील उद्योग येथे येण्यास मदत होणार आहे. मोठे उद्योग आल्याने त्यांना कच्चा माल पुरविणारे उद्योगही निर्माण होतील. यातून अनेकांना रोजगाराच्या संधी मिळतील. उद्योगांची संख्या वाढल्याने खानदेशातील बेरोजगारांचा प्रश्‍न सुटेल. कुशल मनुष्यबळामुळे व्यापारात वृद्धी होण्यास मदत होणार आहे.

पर्यटन क्षेत्रास चांगले दिवस
जिल्ह्यात मुक्ताईनगरला श्रीक्षेत्र मुक्‍ताई, चांगदेव, पाल (ता. रावेर) येथील थंड हवेचे ठिकाण, अजिंठा लेणी, यावलचे श्री व्यास मंदिर, मनुदेवी, पद्मालय येथील गणपती मंदिर, अमळनेरचे मंगळग्रह मंदिर, गरम पाण्यासाठी प्रसिद्ध असलेले उनपदेव, चाळीसगाव येथील पाटणादेवी मंदिर आदी ठिकाणे पर्यटनासाठी उपलब्ध आहेत. चाळीसगावला आता नव्यानेच भास्कराचार्यांची गणित नगरी, के.के.मूस कला दालन साकारण्यात येत आहे. मात्र वाहतूक योग्य चांगले रस्ते नसल्याने इतर जिल्ह्यासह परदेशी पर्यटक हव्या त्या संख्येने पर्यटनासाठी येथे येत नाहीत. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे पर्यटन क्षेत्रावर अधिक पर्यटक येतील, परिणामतः पर्यटनाचे हब म्हणून जिल्ह्याचा विकास होईल.

शैक्षणिक, सामाजिक बदल
जळगाव जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे बदल घडून पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरातील शिक्षणाचा दर्जा येथेही देण्यासाठी प्रयत्न केले जातील. महामार्गामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाल्याने सामाजिक परिस्थितीही बदलेल. समाजमन मेट्रोसिटीतील नागरिकांप्रमाणे तयार होऊन सामाजिक बदल होण्यास मदत होणार आहे.

समांतर रस्त्यांची गरजच
महामार्गावरून होणारी वाहतूक, त्यातून होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेता दररोज कोठेना कोठे अपघात होतोच. यामुळे महामार्गाला समांतर रस्त्यांची गरजच आहे. महामार्गालगतच्या परिसरात विविध ठिकाणी महाविद्यालये, वसतिगृह, कॉलन्या, उपनगरे वसली आहेत.

विद्यार्थ्यांपासून, नोकरदार, व्यापारीसह सर्वांनाच शहरात येण्यासाठी महामार्ग हा एकच पर्याय आहे. समांतर रस्ते झाल्यास या परिसरातील नागरिक समांतर रस्त्यावर वाहतूक करतील. परिणामी महामार्गावरील वाहतूक कमी होऊन अपघातांची संख्या घटेल.

समांतर रस्ते, उड्डाणपुलासाठी ‘मनपा’ देणार जागा - महापौर  
शहरातून गेलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने समांतर रस्ते व उड्डाणपुलासाठी जागा कमी पडल्यास जागा उपलब्ध करून देण्याची हमी महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे समांतर रस्त्यांसह उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी सहकार्य करावे, अशा आशयाचे पत्र महापौर ललित कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज दिले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्ते नाहीत. त्यामुळे दररोज महामार्गावर अपघात होऊन अनेकांना जीव गमवावे लागले. त्यामुळे समांतर रस्त्यांचे काम तत्काळ करणे गरेजेचे आहे. तसेच शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या भूमिपूजननिमित्त केंद्रीय मंत्री गडकरी जळगावात आले असता त्यांनी मुख्य चौकात उड्डाणपुलाला देखील मान्यता दिली होती.

त्यामुळे समांतर रस्ते व उड्डाणपुलांच्या बांधकामासाठी आवश्‍यक जागा उपलब्ध आहे. तरी जागेचा अडसर दूर करून जागा उपलब्ध करून देण्याची हमी जळगाव महापालिका घेत असल्याचे पत्र यापूर्वी दिले आहे. समांतर रस्ते व उड्डाणपुलाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी देखील महापौर ललित कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री गडकरींना पत्राद्वारे केली आहे.

Web Title: jalgaon news highway development