पाणी शुद्ध ठेवून ते टिकवणे गरजेचे - डॉ. राजेंद्रसिंह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

जळगाव - ‘नीर, नारी, नदी’ या तीन घटकांवर मानवी जीवन अवलंबून आहे. पाणी संवर्धन होऊन ते वाचवायला हवे, तसेच जमिनीची सुपीकता टिकवायला हवी. नदी दूषित न करता योग्य व्यवस्थापन करून पाणी शुद्ध ठेवले व टिकविले, तर भारतात दुष्काळ आणि जलप्रलयाची समस्या कधीच उद्‌भवणार नाही, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.

जळगाव - ‘नीर, नारी, नदी’ या तीन घटकांवर मानवी जीवन अवलंबून आहे. पाणी संवर्धन होऊन ते वाचवायला हवे, तसेच जमिनीची सुपीकता टिकवायला हवी. नदी दूषित न करता योग्य व्यवस्थापन करून पाणी शुद्ध ठेवले व टिकविले, तर भारतात दुष्काळ आणि जलप्रलयाची समस्या कधीच उद्‌भवणार नाही, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.

बांभोरी येथील श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ‘फिस्ट’ व्याख्यानमाला आजपासून सुरू झाली, त्यावेळी ते बोलत होते. व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. आर. एच. गुप्ता अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त जयसिंग चव्हाण, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, महाविद्यालयाच्या प्रशासन समितीचे सदस्य शशिकांत कुळकर्णी, डॉ. एस. पी. शेखावत, डॉ. एस. बी. पवार, व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. एम. एम. अन्सारी उपस्थित होते. 

जलसंवर्धनाविषयी डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, की जलप्रदूषण वाढले असून दुष्काळ, प्रलय येत आहे. देश हा विस्थापन, विकृती आणि विनाशाकडे जात आहे. पूर्वी भारतात पाण्याला मोठा आदर होता, तो नष्ट होऊन पाण्याचा बेजबाबदार वापर देशात सुरू आहे. सीरिया, जॉर्डन, सुदान, आफ्रिका खंडात आता पाणी नसल्यामुळे तेथील लोक दुसऱ्या देशात जात आहेत. ही समस्या आपल्या भारतातही निर्माण होऊ शकते, असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्‍त केला. सुरवातीला प्रा. अन्सारी यांनी व्याख्यानमाला आयोजनामागील भूमिका मांडली. प्राचार्य डॉ. वाणी यांनी प्रास्ताविकात सामाजिक क्षेत्रातील समस्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना व्हावा, विविध क्षेत्रातील ज्ञानाचे आदानप्रदान व्हावे, यासाठी ही व्याख्यानमाला महत्त्वाची असल्याचे सांगितले. प्रा. एन. एम. काझी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. व्ही. पी. सांगोरे यांनी आभार मानले.

सामान्यांसारखे हक्क हवे - जयसिंग चव्हाण
व्याख्यानमालेत दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिव्यांग जयसिंग चव्हाण यांनी ‘माझे यश माझ्या हाती’ याविषयी मार्गदर्शन केले. दिव्यांग लोकांना रोजगाराची साधने उपलब्ध करून दिली तर त्यांचा व्यावसायिक विकास होऊन ते शासनाला कर भरू शकतील.  वयाच्या अठराव्या वर्षी एका विस्फोटासारखा मी जागृत झालो. साबण विक्रीचे प्रशिक्षण घेऊन मी साबण विकायला लागलो.  सुरवातीला सुरू केलेल्या कारखान्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. मात्र या परिस्थितीत मी आत्मविश्वास आणि जिद्दीने उभारी घेतली व आज सक्षमपणे उभा आहे. विद्यार्थ्यांनी माझे यश माझ्या हाती आहे, हा मंत्र लक्षात ठेवावा. स्वतःच्या जिद्दीने यश प्राप्ती करा, असे आवाहन त्यांनी केले.

वन्यजीव धोक्‍यात - विनोद पाटील
आपल्या देशाचे वन्यजीव समृद्ध असून, ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. मात्र मानव वन्यजीवांचे महत्त्व जाणत नाही. शुद्ध हवा, पाणी मिळत असूनदेखील मानवाला त्याची किंमत नसल्यामुळे ते नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. या सर्वांमुळे वन्यजीवन धोक्‍यात आले आहे, असे मत वन्यजीव छायाचित्रकार विनोद पाटील (बैजू) यांनी केले. तिसऱ्या सत्रात त्यांनी एलसीडी प्रोजेक्‍टरद्वारे विविध पक्षी, प्राणी यांचे अधिवास, वर्णन, त्यांचे विविध हंगामांतील वर्तन व विविध विश्व विद्यार्थ्यांना दाखविले. विद्यार्थ्यांनी सुरवातीला एक छंद म्हणून वन्यजीव छायाचित्रणाकडे पाहावे व नंतर अभ्यासक म्हणून वन्यजीवांच्या संवर्धनावर काम करून त्यांना वाचविण्यासाठी कृती कार्यक्रम करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

Web Title: jalgaon news Keeping the water clean, they must be sustained