सकल लेवा समाज खडसेंच्या पाठीशी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

सकल लेवा समाज खडसेंच्या पाठीशी 

सकल लेवा समाज खडसेंच्या पाठीशी 

भुसावळ : सकल लेवा समाज ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या पाठीशी आहे. ज्या नेत्याने खानदेशातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रतिकूल स्थिती पक्षाचा विस्तार केला, त्या भाजपने पहिल्या यादीत खडसेंना डावलल्याने लेवा समाज व्यथित असून खडसेंना सन्मानाने उमेदवारी द्यावी, अन्यथा निर्णायक भूमिका घेऊ असा "अल्टिमेटम' भोरगाव लेवा पंचायतीने भाजपला दिला आहे. 
लेवा समाजाचे मोठे संघटन असलेल्या भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबानायक रमेश विठू पाटील यांनी आज भुसावळ येथे पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. ते म्हणाले, चाळीस वर्षांपासून खडसेंनी भाजपची सेवा केली. तरीही तीन वर्षांपासून त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे. आता पुन्हा पहिली यादी जाहीर करताना भाजपने त्यांचे नाव घोषित केले नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. खडसेंना तातडीने सन्मानपूर्वक उमेदवारी जाहीर करावी, अन्यथा समस्त लेवा पंचायत मंडळाची बैठक बोलावून आम्ही निर्णायक भूमिका घेऊ, असे श्री. पाटील म्हणाले. 

आम्ही खडसेंसोबतच 
भाजपने उमेदवारी दिली नाही आणि खडसे राष्ट्रवादी कॉंग्रेस अथवा अन्य पक्षाकडून निवडणूक लढविणार असेल तर आपली काय भूमिका असेल, या प्रश्‍नाच्या उत्तरात "खडसे आमच्या समाजाचे नेते आहेत. त्यामुळे अशा स्थितीत आम्ही खडसेंसोबतच राहू', असे रमेश पाटील यांनी जाहीर केले. आज दिवसभर उमेदवारीबाबत प्रतीक्षा करुन गुरुवारी भोरगाव पंचायतीच्या पंच मंडळाची बैठक होणार असून त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नरेंद्र कोल्हे, ऍड. प्रकाश पाटील, भरत पाटील, सुभाष चौधरी आदी उपस्थित होते. 

भोरगाव लेवा पंचायत ही लेवा समाजाचे संघटन असलेली मोठी संघटना आहे. संपूर्ण समाजात या संघटनेचे प्रमुख असलेल्या कुटुंबनायकाच्या भूमिकेचे महत्त्व आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, रावेर-यावल, मुक्ताईनगर या पाच मतदारसंघात तर विदर्भात मलकापूर, बुलडाणा, मोताळा, अन्यत्र औरंगाबाद, पुणे, ठाणे, कल्याण अशा महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये लेवा समाजाचे प्राबल्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे खडसेंच्या उमेदवारीबाबत भाजपश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon news lewa samaj khadsechya pathishi