यश मिळविण्यासाठी ठेवा ‘लाइव्ह माइंड’ - डॉ. सय्यद

यश मिळविण्यासाठी ठेवा ‘लाइव्ह माइंड’ - डॉ. सय्यद

जळगाव - देशात सामाजिक समस्या खूप आहेत. सामाजिक गरजांच्या विश्‍लेषणातून उद्योजकतेच्या संधी सापडत जातात. स्वतःच्या कल्पनांचे डिझाइन तयार करा. त्यांचा अभ्यास करून विविध साधनांच्या सहाय्याने जाहिरात करा. यातूनच नवीन उद्योग जन्माला येतो. ‘डेड माइंड’ऐवजी ‘लाइव्ह माइंड’ ठेवला, तर निश्‍चितच विविध क्षेत्रांत अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळविता येईल, असे प्रतिपादन ‘रिलायन्स जिओ’चे सहाय्यक उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद यांनी केले.

बांभोरी येथील श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे (एसएसबीटी) आयोजित ‘फिस्ट’ व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ‘उद्योजक होण्यासाठी संधी’ या विषयावर ते बोलत होते. डॉ. सय्यद म्हणाले, की वाचन, चिंतन व मनन ही विद्यार्जनाची प्रक्रिया आहे. मनन म्हणजे चारही बाजूंनी विचार केल्यानंतर जेव्हा समस्येचे उत्तर मिळेल, तेव्हा तुम्ही उद्योजक बनण्याकडे वाटचाल करतात. यासाठी संधी शोधता आली पाहिजे. त्यासाठी ज्ञान- कौशल्य आपल्याकडे हवे. पारंपरिक आणि गोंधळलेल्या अवस्थेतील तरुण केवळ गोंधळच निर्माण करतात. आभासी, कृत्रिम जगात अडकण्यापेक्षा स्वतःला कोठे करिअर करायचे, हे ठरविले पाहिजे. 

‘टेक्‍निकल ट्रेंड’ हा बदलत राहणारा आहे. कोणतेही तंत्रज्ञान कायमस्वरूपी नाही. दर्जात्मक शिक्षण घेण्याकडे आपला कल असावा. त्यामुळे नवीन स्वदेशी तंत्रज्ञान तरुणांनी बनवावे, त्याबाबतची उदासीनता दूर करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

अध्यक्ष म्हणून डॉ. एस. पी. शेखावत, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, शशिकांत कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. पी. व्ही. ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एम. एम. अन्सारी यांनी आभार मानले. व्याख्यानमालेच्या यशस्वितेसाठी प्रा. एन. एम. काझी, डॉ. एस. ए. ठाकूर, प्रा. व्ही. पी. सांगोरे, प्रा. सुधीर पाटील, प्रा. कृष्णा श्रीवास्तव, डॉ. पी. जी. दामले, प्रा. मनोज पाटील, प्रा. धनेश पाटील, प्रा. दिनेश पुरी, प्रा. नितीन जगताप, प्रा. मीरा देशपांडे, प्रा. सारिका पवार आदींनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com