मोदी सरकार करतेय जनतेच्या पैशांची उधळपट्टी: सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

अमळनेर (जळगाव) : 'बहुत हो गयी महंगाई की 'मार'... अब की बार मोदी सरकार' अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मोदी सरकार हे जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. या मायबाप सरकारला स्वत:ची जाहिरात करावी लागत आहे, ही शोकांतिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (सोमवार) येथे सांगितले.

अमळनेर (जळगाव) : 'बहुत हो गयी महंगाई की 'मार'... अब की बार मोदी सरकार' अशी घोषणा करत भाजप सत्तेवर आले. मात्र, महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मोदी सरकार हे जनतेच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. या मायबाप सरकारला स्वत:ची जाहिरात करावी लागत आहे, ही शोकांतिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (सोमवार) येथे सांगितले.

येथील ग्लोबल स्कूलच्या प्रांगणात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री भास्कर जाधव, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, युवकचे अध्यक्ष संग्राम कोते, सुरेखा ठाकरे, राजीव देशमुख, गफ्फार मलिक, जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, ज्येष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील, जगदेवराव गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा विजयाताई पाटील, माजी आमदार प्रा. दिलीप सोनवणे, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, प्रा. सुरेश पाटील, शिवाजी पाटील, अनिल शिसोदे आदी व्यासपीठावर होते.

खासदार सुळे पुढे म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक भाषणाच्या वेळी मोठमोठी स्वप्न दाखवतात. भाषण करण्याचे कौशल्य असल्याने खोटेही ते खरे करून सांगतात. त्यांचे केवळ तोंडच चालते. मात्र, कान चालत नाहीत. मुंबई येथे शिवाजी महाराज स्मारकाच्या कार्यक्रमासाठी पाच कोटी व जाहिरातींवर चौदा कोटी असे 19 कोटींचा खर्च करण्यात आला. हा खर्च जर पाडळसे धरणासाठी दिला असता तर बरे झाले असते. स्वच्छता अभियानाचे खरे प्रवर्तक माजी उपमुख्यमंत्री (कै.) आर. आर. पाटीलच आहेत. त्यांची पोकळी आजही पक्षाला जाणवत आहे. जास्त गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहावे. कडू बोलणारा नेहमी चांगला असतो. याचाच प्रत्यय म्हणजे आपले अजितदादा होय. अजितदादा हे दादागिरी करणारे नसून जनतेचे हित जोपासणारे प्रेमाचे दादा आहेत, असेही त्या म्हणाल्या.

सुनील तटकरे म्हणाले, की 'खोटे बोल पण रेटून बोल' अशी भूमिका या खोटारड्या सरकारने लावून धरली आहे. कृषी सन्मान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची हेळसांड केली जात आहे. शरद पवार यांनी केंद्रीय कृषीमंत्री असताना 71 हजार कोटींची सरसकट कर्जमाफी केली होती. मात्र, जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होत नाही तसेच सातबारा उतारा कोरा होत नाही, तोपर्यंत हल्लाबोल आंदोलन सुरूच राहील. ऑनलाईनमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासाठी जनतेने या ऑनलाइन सरकारला ऑफलाईन करण्याची गरज आहे.

दिलीप वळसेपाटील म्हणाले, की मोदी सरकारने अच्छे दिन, भ्रष्टाचारमुक्‍त भारत, काळा पैसा, दरवर्षी दोन कोटी रोजगारनिर्मिती असे अनेक आश्‍वासने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही आश्‍वासन पूर्ण झालेले नाही. भाजपने केलेल्या नवीन सर्व्हेच्या अहवालानुसार आगामी निवडणुकांत आपली सत्ता येत नसल्याचे पाहून नवीन मुद्ये ते शोधत आहेत. भाजपची पीछेहाट सुरू झाली असून, त्याचा प्रत्यय गुजरातच्या निवडणुकीत दिसून आला आहे. मन की बात म्हणणारे पंतप्रधान मोदी हे विजय मल्ल्या, ललित मोदी यांच्या बाबतीत मौन का बाळगतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. धर्मा पाटलांसारख्या वृद्ध शेतकऱ्याला मंत्रालयात येऊन आत्महत्या करावी लागली. सद्यःस्थितीत फडणवीस सरकारने 4 लाख 50 हजार कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. यात कोणताही घटक समाधानी नाही. शिवसेनाही बोटचेपे धोरण अवलंबत आहे. भ्रष्टाचाराबाबत हे सरकार नाथाभाऊंना वेगळा न्याय व इतरांना वेगळा न्याय देत आहेत. अनिल भाईदास पाटील यांनी प्रास्ताविक केले. विनोद कदम व संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. सभेपूर्वी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्ह्याचे पक्ष संपर्कप्रमुख दिलीप वळसेपाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमळनेर मतदारसंघातून अनिल भाईदास पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. यास खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुष्टी दिली आहे.

Web Title: jalgaon news mp supriya sule government narendra modi