बिलातील रकमेच्या आकड्यांनी गाळेधारक हादरले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

जळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या संकुलातील गाळेधारकांचे गाळे ताब्यात घेण्याची व थकीत भाडे वसूल करण्याची प्रक्रिया महापालिकेने आजपासून सुरू केली. सेंट्रल फुले व फुले मार्केटमधील ९१० पैकी ८५० गाळ्यांचे थकीत भाडे व घरपट्टीपोटी १६५ कोटींची बिले महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागाच्या पथकाने वाटप केली. बिलांची मोठी रक्कम पाहून गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली असून, महापालिका प्रशासनाविरुद्ध गाळेधारकांनी रोष व्यक्त केला आहे. 

जळगाव - महापालिकेच्या मुदत संपलेल्या संकुलातील गाळेधारकांचे गाळे ताब्यात घेण्याची व थकीत भाडे वसूल करण्याची प्रक्रिया महापालिकेने आजपासून सुरू केली. सेंट्रल फुले व फुले मार्केटमधील ९१० पैकी ८५० गाळ्यांचे थकीत भाडे व घरपट्टीपोटी १६५ कोटींची बिले महापालिकेच्या किरकोळ वसुली विभागाच्या पथकाने वाटप केली. बिलांची मोठी रक्कम पाहून गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली असून, महापालिका प्रशासनाविरुद्ध गाळेधारकांनी रोष व्यक्त केला आहे. 

महापालिका स्थायी समितीची सभा शुक्रवारी झाली. यात जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांना शासनाचे मिळालेले पत्र, आलेल्या तक्रारीवरून गाळेधारकांना शनिवारपासून बिले वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत, असे सांगितले होते. त्यानुसार आज किरकोळ वसुली विभागाचे अधिकारी नरेंद्र चौधरी यांच्या १४ जणांच्या पथकाने फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये सकाळी साडेदहापासून गाळेधारकांना बिले वाटप करण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली. काही गाळेधारकांनी बिल घेण्यास नकार देवून महापालिका कर्मचाऱ्यांशी वाद घातला. बिले वाटप सुरू असताना बारा वाजता अप्पर आयुक्तांनी फुले मार्केटमध्ये जाऊन बिले वाटपाचा आढावा घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या, तर थकीत भाडे, घरपट्टीची आलेली मोठी रक्कम पाहून गाळेधारकांमध्ये आज चिंतेचे वातावरण दिसत होते. तर काही गाळेधारक महापालिका प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त करत असल्याचे चित्र संकुलात दिसत होते.

१६५ कोटींच्या बिलांचे वाटप
महापालिकेच्या मुदत संपलेल्या १८ व्यापारी संकुलांतील गाळेधारकांनी २०११ पासून गाळेधारकांनी भाडे भरलेले नाही. त्यांना रेडीरेकनरच्या दरानुसार तयार केलेली बिले व घरपट्टी देण्यात गाळेधारकांना देण्यात आली आहे. त्यात सेंट्रल फुले व महात्मा फुले मार्केटमधील ९१० गाळेधारकांना १६५ कोटी रुपयांचे बिल अदा केले आहे. त्यात १२ ते ५४ लाखांपर्यंतचे थकीत भाडे, घरपट्टी २० हजार ते सहा लाख रुपये हे गाळ्यांची जागा तसेच दुकानांची संख्येनुसार बिलात आकारणी केलेली आहे. बिल अदा केल्यापासून गाळेधारकांना १५ दिवसांत हे पैसे भरावे लागणार आहेत. 

गाळेधारकांच्या घरी बिल डकवा
किरकोळ वसुली विभागाचे पथक फुले व सेंट्रल फुले मार्केटमध्ये सकाळी बिलांचे वाटप करण्यासाठी गेले. यावेळी संकुलातील गाळेधारकांनी बिल घेण्यास नकार दिला. त्यानंतर पदाधिकारी यांच्याशी महापालिका अधिकारी यांच्यात चर्चा झाल्यानंतर गाळेधारकांनी बिले स्वीकारली. अप्पर आयुक्त कानडे बिले वाटप सुरू असताना पाहणीसाठी आले असता जे कोणी गाळेधारक बिल स्वीकारणार नाही, त्यांच्या घरी जाऊन दारावर बिल डकविण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. 

अप्पर आयुक्तांच्या गाडीला घेराव
फुले मार्केटमध्ये थकीत भाड्याच्या बिलांचे वाटप करण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आलेले अप्पर आयुक्त कानडे आले. यावेळी व्यापाऱ्यांनी अप्पर आयुक्तांच्या गाडीला घेराव घालून थकीत बिलात लावलेले मोठी रक्कम, तसेच महापालिकेचे चुकीचे धोरण याबाबतची नाराजी यावेळी व्यक्त केली. 

 बिले तयार करण्याचे काम सुरू
महापालिकेच्या मुदत संपलेल्या १८ व्यापारी संकुलांत २ हजार ३८४ गाळेधारक आहेत. त्यात आज फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील ९१० गाळेधारकांपैकी ८५० थकीत भाड्याचे बिल देण्यात आले. उर्वरित संकुलांतील गाळ्यांचे बिल तयार करण्याचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने या संकुलाच्या बिलांचे वाटप केले जाणार असल्याची माहिती किरकोळ वसुली विभागाचे श्री. चौधरी यांनी दिली. 

कर्ज घेऊन ही आर्थिक संकट राहणार 
बिल वाटप केल्यानंतर गाळेधारक थकीत भाड्याची मोठी रक्कम पाहून चक्रावून गेले आहेत. त्यामुळे गाळेधारकांमध्ये एकत्र चर्चा होऊ लागली असल्याने त्यात थकीत भाडे भरल्यानंतर लिलावात गाळा घेण्यासाठी बॅंक कर्ज उपलब्ध करून देणार, असे आयुक्त सांगतात. पण कर्ज घेऊन हे पैसे व्यापारी फेडणार कसे, असा प्रश्‍न गाळेधारकांनी व्यक्‍त केला.  

दुकाने बंद ठेवून विरोध करू 
सेंट्रल व फुले मार्केटमधील गाळेधारकांना बिले वाटप झाल्यानंतर बिलातील मोठी रक्कम पाहून गाळेधरकांमध्ये गोंधळ उडाला. एवढे पैसे भरावे कुठून, त्यानंतर गाळे लिलावासाठी पैसे आणावे कुठून, असे प्रश्‍न गाळेधारकांनी उपस्थित केले. बिलातील रकमेच्या मोठ्या आकड्यांबाबत दुकाने बंद ठेवून विरोध करू, अशी चर्चा गाळेधारकांमध्ये सुरू होती. 

Web Title: jalgaon news municipal corporation shop holder