वसुली कारवाईत जैन यांची ‘मनपा’ अधिकाऱ्यांना धमकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

जळगाव - शहरातील शंभर बड्या घरपट्टी थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी प्रशासनातर्फे कडक पावले उचलली जात आहेत. यानुसार आज घरपट्टी वसुलीसाठी प्रभाग एकमधील ‘यश प्लाझा’ येथे प्रभाग अधिकारी वसुली करण्यासाठी गेले असता मालमत्ताधारकाने अधिकाऱ्यांना चुकीची कारवाई करत असल्याचे सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, असे धमकावत वाद घातला. त्यानंतर प्रभारी अप्पर आयुक्त व सहाय्यक आयुक्त घटनास्थळावर आले असता त्यांना ‘यश प्लाझा’चे संपूर्ण बांधकाम अनधिकृत असल्याचे प्राथमिक पाहणीतून आढळले.

जळगाव - शहरातील शंभर बड्या घरपट्टी थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी प्रशासनातर्फे कडक पावले उचलली जात आहेत. यानुसार आज घरपट्टी वसुलीसाठी प्रभाग एकमधील ‘यश प्लाझा’ येथे प्रभाग अधिकारी वसुली करण्यासाठी गेले असता मालमत्ताधारकाने अधिकाऱ्यांना चुकीची कारवाई करत असल्याचे सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल करतो, असे धमकावत वाद घातला. त्यानंतर प्रभारी अप्पर आयुक्त व सहाय्यक आयुक्त घटनास्थळावर आले असता त्यांना ‘यश प्लाझा’चे संपूर्ण बांधकाम अनधिकृत असल्याचे प्राथमिक पाहणीतून आढळले. यावरून बांधकाम मोजमाप, पंचनामा करण्याच्या सूचना देऊन हे बांधकाम निष्काशित केले जाणार असल्याची माहिती अप्पर आयुक्त राजेश कानडे यांनी दिली.   

जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकरांनी बड्या थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी महापालिकेतील बारा अधिकाऱ्यांसह २४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार वसुलीची कारवाई दोन-तीन दिवसांपासून सुरू आहे. प्रभाग एकमधील शाहूनगर रस्त्यावरील यश प्लाझा या मालमत्तेच्या वसुलीसाठी गेले असता मालमत्ताधारक मनीष सतीश जैन, अतुल सतीश जैन यांनी प्रभाग अधिकारी विलास सोनवणी यांना घरपट्टी चुकीची, तसेच वसुली चुकीची लावण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच सोनवणी यांच्यावर तुम्ही खंडणी मागत आहेत, असा गुन्हा दाखल करतो, असे धमकावले. घडलेल्या घटनेची माहिती तत्काळ अप्पर आयुक्त कानडे यांना सोनवणी यांनी दिली. तत्काळ अप्पर आयुक्त व सहाय्यक उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार हे घटनास्थळावर गेले.

यावेळी पाहणी दरम्यान यश प्लाझाचे वीस हजार स्क्वेअर फुटावरील दोन मजल्याचे, तसेच गच्चीवरील शेडचे अनधिकृत बांधकाम कोणत्याही परवानगी विना बांधल्याचे आढळून आले. पुढील सात दुकाने देखील भाडेकरूला दिलेले दाखवून घरपट्टी कमी आकारल्याचे आढळून आले. तसेच सहा गोडाऊन विनापरवानगीचे आढळले. याबाबत मुंबई महापालिका अधिनियम अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

१९ लाख ९६ हजार थकबाकी
‘यश प्लाझा’चे सध्याचे ८० हजार रुपये घरपट्टी आकारणीनुसार एकूण १९ लाख ९६ हजार १४४ रुपये एवढी थकबाकी वसुली करण्यासाठी प्रभाग अधिकारी आज ‘यश प्लाझा’च्या मालमत्ताधारकांकडे गेले होते. परंतु चुकीची घरपट्टी आकारणी करीत असल्याचा आरोप महापालिका अधिकाऱ्यांवर जैन बंधूनी केला. परंतु महापालिकेच्या दफ्तरी भाडेकरार, तसेच नोंदीतून हे बांधकाम अनधिकृत असल्याचे दिसत असल्याचे सहाय्यक आयुक्त कानडे यांनी सांगितले.

Web Title: jalgaon news municipal officer warning by jain