पाच वर्षांपासून नवजात बालकांसाठीचे व्हेंटिलेटर धूळखात

राजेश सोनवणे
रविवार, 10 सप्टेंबर 2017

जिल्हा रुग्णालयातील स्थिती; एकसमान ऑक्‍सिजन पुरवठ्याची यंत्रणा नाही

जळगाव - नवजात बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या पालकांना आपल्या बालकाला चांगला उपचार मिळावा, या हेतूने जिल्हा सामान्य रुग्णालयांतील नवजात शिशू विभागाकरिता रोटरी क्‍लब जळगाव वेस्टच्या माध्यमातून २०१२ मध्ये नवीन व्हेंटिलेटर मशिन देण्यात आले आहे. परंतु येथे एकसमान ऑक्‍सिजन पुरवठा करण्याची यंत्रणा नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून हे मशिन धूळखात पडून असल्याची स्थिती आहे. आरोग्य विभागाच्या अशा अनास्थेमुळे नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण मात्र वाढत आहे. 

शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये नवजात अर्भक व बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना गेल्या महिन्यात घडल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्वच जिल्हा रुग्णालयांमधील सुविधांबाबतची समस्या एकसारखीच आहे. सुविधांअभावी अर्भकांचा जीव धोक्‍यात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशाच प्रकारची स्थिती जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या ‘एनआयसीयू’मध्ये आहे. मुळात येथे इनक्‍युबेटर मशिनची कमतरता असताना, रोटरीच्या माध्यमातून मिळालेले व्हेंटिलेटर मशिन देखील धुळखात पडून आहे. यामुळे गरीब रुग्णांना चांगल्या सुविधा कधी मिळतील? हा प्रश्‍न निर्माण होत आहे.

एकसमान ऑक्‍सिजन सुविधेचा अभाव
रोटरी क्‍लब जळगाव वेस्टच्या माध्यमातून २०१२ मध्ये जिल्हा रुग्णालयाला व्हेंटिलेटर मशिनसह आवश्‍यक असलेले वेगवेगळ्या मशिन मिळून १४ लाखाचे साहित्य भेट म्हणून दिले. परंतु यातील व्हेंटिलेटर मशिन चालू स्थितीत नसल्याचे चित्र आहे. हे मशिन लावण्यासाठी सर्व ठिकाणी एकसमान ऑक्‍सिजन पुरवठा करणारी यंत्रणा आवश्‍यक आहे. पण, जिल्हा रुग्णालयात याची सुविधाच नसल्याने मशिन अक्षरशः पाच वर्षांपासून धुळखात पडले आहे. यंत्रणा लावण्याकरिता २०१३ मध्ये आणि तीन महिन्यांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासाठी साधारण ७० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे शासनाला कळविण्यात आल्याचे डॉ. स्वप्नील कळसकर यांनी सांगितले.

एका इन्क्‍युबेटरमध्ये दोन बालके
रुग्णालयातील अतिदक्षता विभागात नवजात बालकांसाठी १८ इन्क्‍युबेटर मशिन आहेत. परंतु हे मशिन अपूर्ण पडत असल्याने एका मशिनमध्ये दोन किंवा तीन बालकांना ठेवले जात असल्याचे चित्र आहे. मुळात एका मशिनमध्ये एकाच बालकाला ठेवणे अपेक्षित असताना दोन- तीन बालके ठेवण्यात येत असल्याने एकाचा संसर्ग दुसऱ्यास लागण्याची भीती असते. यामुळे बालकाचा मृत्यू देखील होण्याची शक्‍यता अधिक वाढत असते.

कमी वजनाच्या नवजात बालकांना इन्क्‍युबेटर मशिनमध्ये ठेवले जाते. ते एकामध्ये एकच ठेवणे अपेक्षित आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाला रोटरी जळगाव वेस्टचा अध्यक्ष असताना व्हेंटिलेटर दिले आहे. ते सुरू नसल्याची माहिती मिळाली असून, गरिबांना याचा लाभ होण्याच्या दृष्टीने ते सुरू व्हायला हवे.
- डॉ. राजेश पाटील, अध्यक्ष, बालरोगतज्ज्ञ संघटना

Web Title: jalgaon news new child ventilator