वाळू माफियांचा आता नवा फंडा 

वाळू माफियांचा आता नवा फंडा 

वाळू माफियांचा आता नवा फंडा 

जळगाव : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने तोकड्या का होईना उपाययोजना सुरू केल्याने अस्वस्थ झालेल्या वाळूमाफियांनी आता बंदिस्त ट्रकद्वारे वाळू वाहतूक सुरू केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. असाच एक ट्रक तहसीलदारांनी गेल्या आठवड्यात पकडला. आणखी दोन ट्रकही पकडण्यात आले आहेत. 

जळगाव जिल्हा अवैध वाळू वाहतुकीच्या बाबतीत आधीच बदनाम झाला आहे. ही समस्या राज्यात सार्वत्रिक असली तरी जळगाव जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र, नद्यांचे अस्तित्व आणि तेथील मोठ्या प्रमाणातील वाळूसाठा या अनुकूल घटकांमुळे वाळूमाफियांचे चांगलेच फावले आहे. हा पूर्णवेळ व्यवसाय झाला असून बहुतांश राजकीय पदाधिकाऱ्यांचे वाळूचे ठेके असल्याचे बोलले जाते. काही ठिकाणी तर आमदार, मंत्रीही वाळूठेक्‍यांमध्ये "पार्टनर' असल्याचे सांगण्यात येते. 

प्रशासनाची कठोर भूमिका 
राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय बऱ्यापैकी फोफावला असून, त्यातून अनेक जण कोट्यधीशही झालेत. गेल्या काही वर्षांत जिल्हा व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात मोहीम उघडली. हा प्रश्‍न जेव्हा गंभीर होतो, तेव्हा मोहीम तीव्र करण्यात येते. नंतर मात्र मोहीम थंडावते, असा अनुभव आहे. असे असले तरी प्रशासन याबाबत कठोर झाल्याने, विशेषत: जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्याने घेतल्याने वाळू माफियांवर काही प्रमाणात वचक निर्माण झाला. 

वाहतुकीचा नवा "फंडा' 
गेल्या साधारण वर्ष- दोन वर्षांत जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली. सर्वसाधारणपणे खुल्या ट्रक, ट्रॅक्‍टर व डंपरमधून वाळू वाहतूक केली जाते. परंतु ही तीनही वाहने खुली असल्याने त्यांच्यावर कारवाई करणे सहज शक्‍य होते. त्यामुळे वाळू व्यावसायिकांनी आता त्यावर इलाज शोधून वाळू वाहतुकीचा नवा फंडा सुरू केला आहे. मालवाहू बंदिस्त ट्रकमधून वाळू वाहतूक होत असून, ट्रक बंदिस्त असल्याने वाळू दिसत नाही आणि इतर वाहनांपेक्षा अधिक साठा वाहून नेला जाऊ शकतो, म्हणून ही पद्धत अलीकडे सर्रास सुरू आहे. 

तीन वाहने जप्त 
गेल्या आठवड्यात जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांनी आकाशवाणी चौकात रात्री साडेनऊच्या सुमारास असाच एक बंदिस्त ट्रक थांबवला. त्यातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहून नेली जात असल्याचे लक्षात आले. उपशाच्या पावत्या नसल्याने या अवैध वाळूसाठ्यासह ट्रक तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. अन्य दोन- तीन वाहनेही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

बंदिस्त ट्रक "सेफ' 
ताडपत्रीने बंदिस्त ट्रक वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी सुरक्षित आहे. तीनही बाजूंनी ताडपत्री असल्याने आतून कोणता माल नेला जातोय, हे दिसत नाही. तसेच मागील बाजूकडूनही ताडपत्री लावून माल दिसणार नाही, याची वाळूमाफियांकडून पुरेपूर काळजी घेतली जाते. ट्रॅक्‍टरच्या तुलनेत अधिक वाळू वाहून नेली जाऊ शकते. 

कोट.. 
बंदिस्त ट्रकमधून वाळू वाहतूक होत असल्याचा प्रकार लक्षात आला. अशा वाहनांवर कारवाई सुरू आहे. संबंधितांना नोटिसा बजावल्या असून, दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे. अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोहीम सुरूच राहील. 
- वैशाली हिंगे, तहसीलदार, जळगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com