esakal | भाजपच्या ज्योतिष्याचे भविष्य खरे ठरणार नाही : शरद पवार 
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

भारतीय जनता पक्षाचे लोक राज्यातील सरकार पडणार असे नेहमी म्हणत असता. त्यांच्याकडे ज्योतीषी भरपूर आहेत त्यामुळे ते त्यांचे भविष्य वर्तवित असतात. मात्र आम्ही ग्रामीण भागातील लोक आहोत, आम्हाला ज्योतीष कळत नाही.

भाजपच्या ज्योतिष्याचे भविष्य खरे ठरणार नाही : शरद पवार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भारतीय जनता पक्षात ज्योतिष जाणणारे अधिक लोक आहेत. त्यामुळे ते नेहमी राज्यातील सरकार पडण्याचे भविष्य वर्तवित असतात. आम्ही ग्रामीण भागातील मंडळी आहोत आम्हला ज्योतिष्य काही कळत नाही, मात्र पुढची चार वर्षे राज्यातील सरकारला काही धोका नाही अस आम्हाला तरी दिसतंय असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले. 

क्‍लिक करा - राज्याच्या विकासाला केंद्राकडून मदत नाही,संसदेत मांडणार प्रश्‍न : शरद पवार


जळगाव येथील जैन हिल्स येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्रभैय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील उपस्थित होते. यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, कि भारतीय जनता पक्षाचे लोक राज्यातील सरकार पडणार असे नेहमी म्हणत असता. त्यांच्याकडे ज्योतीषी भरपूर आहेत त्यामुळे ते त्यांचे भविष्य वर्तवित असतात. मात्र आम्ही ग्रामीण भागातील लोक आहोत, आम्हाला ज्योतीष कळत नाही. मात्र आम्हाला जे समजते त्यावरून तरी राज्यातील सरकारला पुढची चार वर्षे काहीही होणार अस आम्हाला दिसते आहे. त्यामुळे त्यांनी काहीही भविष्य वर्तविले तरी ते खरे ठरणार नाही हे निश्‍चित आहे. 

फडणवीसांचे सत्य दडपण्याचा प्रयत्न 
एल्गार परिषदेचा एनआयकडे तपास देण्याबाबत ते म्हणाले, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी जी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे सत्य बाहेर आले असते. त्यामुळे हे सत्य दडपण्यासाठीच केंद्र सरकारने राज्य सरकारकडून एल्गार परिषदेचा तपास काढून एनआयकडे दिला आहे. केंद्रांचा तपासाचा अधिकार निश्‍चित आहे, परंतु त्यांनी राज्य सरकारची सहमती घेतली पाहिजे होती. ती त्यांनी घेतली नाही. तरीही राज्याला चौकशीचा स्वतंत्र आधिकार आहे. 

दिल्लीने मोदी,शहांची हुकूमत नाकारली 
दिल्लीच्या निवडणूकीच्या निकालाबाबत शरद पवार म्हणाले,दिल्ली मध्ये सर्व राज्यातील लोक राहतात, त्यामुळे त्या ठिकाणच्या निवडणूकीचा निकालाच अर्थच वेगळा आहे. "मिनी इंडिया'ने दिलेला हा निकाल आहे. या ठिकाणच्या जनतेने "आप'ला विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यावर खुली नाराजी जाहिर केली आहे. या निकालाचे परिणाम पुढील सर्व निवडणूकीतही दिसून येतील हे निश्‍चित आहे. 
 

loading image