शिवसेनेचे उद्या  बॅंकांसमोर ‘ढोल वाजवा’आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

जळगाव - शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र महिनाभरानंतरही शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज तर मिळालेच नाही, परंतु कर्जमाफीही झालेली नाही. शासनाच्या या घोषणेच्या निषेधार्थ तसेच शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा या मागणीसाठी सोमवारी (ता. १०) जिल्हा बॅंक व राष्ट्रीयकृत बॅंकांसमोर ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शिवसेनेचे आंदोलन तसेच उद्धव ठाकरेंचा जळगाव जिल्हा दौरा यावर नियोजन करण्यासाठी शिवसेनेची बैठक आज घेण्यात आली. याबाबतची माहिती जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन पद्मालय विश्रामगृहात केले होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, आर. ओ. तात्या पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हाप्रमुख जळकेकर महाराज उपस्थित होते. यावेळी माहिती देताना श्री. वाघ यांनी सांगितले की, शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली परंतु अद्यापपर्यंत कोणालाही त्यांचा लाभ मिळाला नाही. शासनाची ही घोषणा फसवी ठरली आहे. शेतकऱ्यांना मात्र त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाचा निषेध आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी सोमवारी जळगावात सकाळी अकरा वाजता जिल्हा बॅंकेसमोर तसेच स्टेट बॅंक तसेच लीड बॅंक सेंट्रल बॅंकेसमोर ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात येईल. यात जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. 

उद्धव ठाकरे बुधवारी जिल्हा दौऱ्यावर
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी (ता.१२) जिल्हा दौऱ्यांवर येत आहेत. यात त्यांची धरणगाव येथे दुपारी बाराला तर पारोळा येथे दुपारी दीडला सभा होईल. त्याअगोदर सकाळी अकरा वाजता पाळधी (ता. धरणगाव)येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्याचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

Web Title: jalgaon news shiv sena bank