‘सिमॅसिस- यिन’ घडविणार नोकरी देणारे संस्कारक्षम उद्योजक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

जळगाव - ‘‘तरुणांचा देश म्हणून ओळख असलेल्या भारतातील तरुणाईला विविध क्षेत्रांतील कामांसाठी कुशल करतानाच ‘सिमॅसिस- यिन’च्या माध्यमातून केवळ नोकरी करणारे नव्हे; तर नोकरी देणारे संस्कारक्षम व यशस्वी उद्योजक, व्यावसायिक घडतील,’’ असा विश्‍वास ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’चे (यिन) मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी यांनी व्यक्त केला.

जळगाव - ‘‘तरुणांचा देश म्हणून ओळख असलेल्या भारतातील तरुणाईला विविध क्षेत्रांतील कामांसाठी कुशल करतानाच ‘सिमॅसिस- यिन’च्या माध्यमातून केवळ नोकरी करणारे नव्हे; तर नोकरी देणारे संस्कारक्षम व यशस्वी उद्योजक, व्यावसायिक घडतील,’’ असा विश्‍वास ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’चे (यिन) मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी यांनी व्यक्त केला.

‘सिमॅसिस- यिन’ उपक्रमांतर्गत राज्यभरातील तरुणांसाठी ‘नेतृत्व व कौशल्यविकास’ कार्यक्रम राबविण्यात येत असून, कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी येथील नूतन मराठा महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्री. गुजराथी बोलत होते. व्यासपीठावर ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, युनिट मॅनेजर संजय पागे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. डी. पाटील, ‘यिन’चे मार्गदर्शक राम गुडगिला, विभागीय प्रमुख कुणाल क्षीरसागर, श्‍यामसुंदर माडेवार, ‘यिन’चे महाविद्यालयातील अध्यक्ष पीयूष पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. गुजराथी यांनी ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’द्वारे ‘सिमॅसिस- यिन’ उपक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या ‘नेतृत्व व कौशल्यविकास’ कार्यक्रमाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच भाग म्हणून तरुणाईला रोजगार, स्वयंरोजगार, नेतृत्वासाठी तयार करण्याच्या हेतूने ‘सिमॅसिस- यिन’अंतर्गत हा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. शिक्षणातून केवळ ज्ञान मिळते. मात्र, नोकरी- उद्योग अथवा व्यवसायासाठी सज्ज होण्यासाठी हा ‘नेतृत्व व कौशल्यविकासा’चा हा कोर्स तरुणांना निश्‍चितच उपयुक्त ठरेल. केवळ नोकरीसाठी नव्हे; तर स्वत:चा उद्योग- व्यवसाय सुरू करण्यासाठी तरुणांना परिपूर्ण करावे, हा या ऑनलाइन अभ्यासक्रमामागचा उद्देश आहे.

सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महाविद्यालयातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. निवासी संपादक बुवा यांनी प्रास्ताविकात ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सामाजिक उपक्रमांबाबत भूमिका मांडली. ‘सिमॅसिस- यिन’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी उभारी देण्याचा ‘सकाळ’चा प्रयत्न आहे. सामाजिक परिवर्तनाचे व्रत जोपासताना तरुणाईच्या विकासासाठीचा हा उपक्रम निश्‍चितच उपयुक्त ठरेल, असा विश्‍वासही श्री. बुवा यांनी व्यक्त केला. यावेळी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ॲड. विजय पाटील आदी उपस्थित होते. प्रा. राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

सहा महाविद्यालयांमध्ये मार्गदर्शन
नूतन मराठा महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर श्री. गुजराथी यांच्यासह ‘यिन’चे मार्गदर्शक डॉ. राम गुडगिला, विभागीय प्रमुख कुणाल क्षीरसागर, श्‍यामसुंदर माडेवार यांनी शहरातील विविध सहा महाविद्यालयांमध्ये जाऊन या ‘नेतृत्व व कौशल्यविकास’ कार्यक्रमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘यिन’चे समन्वयक अंकुश सोनवणे यावेळी उपस्थित होते.

प्राचार्य, प्राध्यापकांशी साधला संवाद
दुपारच्या सत्रात ‘हॉटेल रॉयल पॅलेस’मध्ये आयोजित बैठकीत  तेजस गुजराथी यांनी विविध प्रमुख महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख तसेच प्राध्यापकांशी या कार्यक्रमाबाबत संवाद साधला. ‘नेतृत्व व कौशल्यविकासा’वर आधारित या ऑनलाइन अभ्यासक्रमाचे स्वरूप, त्यातून विद्यार्थ्यांना नेमके कसे मार्गदर्शन मिळेल. त्यातून त्यांना कसा फायदा होईल, याबाबतची माहिती त्‍यांनी दिली. प्राचार्य, प्राध्यापकांनी या विषयासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नांनाही त्‍यांनी समर्पक उत्तरे दिली. या उपक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील, यासाठी प्रयत्न करू, असे प्राचार्य व विभागप्रमुखांनी यावेळी सांगितले.

Web Title: jalgaon news simaces-YIN