पांझण डावा कालव्याच्या पाटचारीची दुरवस्था

दीपक कच्छवा
बुधवार, 21 मार्च 2018

पाणी मागणे अर्ज देणे केले बंद - आबासाहेब जगताप  
​पाटचाऱ्या असूनही पाणी मिळत नाही. त्यामुळे पाच ते सहा वर्षांपासून पाणी मागणी अर्ज देणे बंद केले आहे. आमच्या विहिरींना जोपर्यंत पाणी आहे, तोपर्यंतच परिस्थिती बरी आहे. त्यानंतर मात्र हाल होण्याची शक्‍यता आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : गिरणा धरणाच्या पांझण डावा कालव्याच्या पाटचारीची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने धामणगाव (ता.चाळीसगाव) या भागातील काही शेतकरी पाण्यापासून वंचित राहात आहेत.त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने या पाटचारीची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. 

गिरणा धरणातून आलेला मुख्य पांझण डावा कालवा हा सुमारे 53 किलोमीटर लांबीचा आहे. या कालव्याद्वारे सध्या शेतीसाठी पाणी सुरू आहे. या कालव्याला असलेल्या दहा क्रमांकाच्या पाटचारीची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या चारीचे पाणी दहिवद शिवारापर्यंतच येते. पुढे पाणीच जात नसल्याने या पाटचारीच्या लगतचे शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. पाटचारी क्रमांक 11 ला थोड्याफार प्रमाणात पाणी येते.

मात्र, त्या पाण्यावर कुठलेच पीक शेतकऱ्यांना घेता येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून मुकावे लागत आहे. पाटबंधारे विभागाने पाटचारीच्या दुरुस्तीसंदर्भात नियोजनच केलेले नाही. जवळच्या दहिवद, करमुड शिवारात पाणीच पाणी झाले आहे. धामणगाव भागातील दोन्ही पाटचारींवर दहिवद भागातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, इतर बहुतांश शेतकरी या पाण्यापासून वंचित आहेत. पाटबंधारे विभागाने या पाटचाऱ्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 

एकाचवेळी लोकसहभागातून दुरुस्ती 
धामणगावला डाव्या कालव्यातून आलेल्या दहा नंबर पाटचारीची पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी सत्तर हजार रुपये गोळा करून दुरुस्ती केली होती. मात्र, त्यानंतर दुरुस्तीच न झाल्याने झाडेझुडपे वाढली आहेत. पाटबंधारे विभागाने या चारीच्या दुरुस्तीकडे लक्षच न दिल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. 

न्याय तरी कोणाकडे मागावा? - नितीन निकम 
ज्या लोकांनी पाणी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत, त्यांना पाणी मिळत नाही. पाटबंधारे विभागाकडून मात्र पाणीपट्टी वसूल केली जाते. त्यामुळे पाण्यासाठी आम्हा शेतकऱ्यांनी न्याय तरी कोणाकडे मागावा? 

हक्काच्या पाण्यापासून वंचित - रमेश पवार
माझ्याकडे जवळपास 55 गुरे आहेत. पाटचारी क्रमांक दहा लगत माझे शेत असून जवळपास पाणी नसल्यामुळे दुसऱ्याच्या विहिरीवरून पाणी आणून गुरांना पाणी पाजावे लागत आहे. हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. 

पाणी मागणे अर्ज देणे केले बंद - आबासाहेब जगताप  
पाटचाऱ्या असूनही पाणी मिळत नाही. त्यामुळे पाच ते सहा वर्षांपासून पाणी मागणी अर्ज देणे बंद केले आहे. आमच्या विहिरींना जोपर्यंत पाणी आहे, तोपर्यंतच परिस्थिती बरी आहे. त्यानंतर मात्र हाल होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Jalgaon news water canel in chalisgaon