आरोग्य संवर्धनासाठी महिलांची पावले ‘जिम’कडे!

आरोग्य संवर्धनासाठी महिलांची पावले ‘जिम’कडे!

जळगाव - हिवाळ्याची चाहूल लागताच आरोग्याच्या समस्या वाढू लागतात. वाढत्या शहरीकरणामुळे मानवाची जीवनशैलीही बदलत चालली आहे. प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत जागरूक झाला आहे. त्यातच महिला व युवतींमध्ये सध्या ‘स्लिम’ दिसण्याची सर्वाधिक क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात आपला फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी शहरातील युवती व महिलांची पावले जिमकडे वळू लागली आहेत.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात धावपळ आणि ताणतणाव वाढत असला तरी आरोग्याकडे लक्ष देणेही तेवढेच गरजेचे झाले आहे. शहरातील युवती व महिलावर्ग स्मार्टनेससोबतच फिटनेसकडेही लक्ष देऊ लागल्या आहेत. थंडीत आरोग्याच्या अधिक समस्या निर्माण होत असल्याने आरोग्य संवर्धनासाठी थंडीची चाहूल लागताच महिला जिमकडे वळल्या आहेत. आजकाल जिम हे आधुनिक व्यायामाचे ठिकाण बनले असल्याने जिमला व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यात जिमचा दर्जा हा त्याठिकाणी असणाऱ्या अत्याधुनिक साधनांवर ठरलेला आहे. 

‘जिम’मुळे रोजगाराच्या संधी 
सध्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्यामुळे जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. या क्षेत्रात आवड असलेल्यांना जिममध्ये ट्रेनर, जिम इन्स्ट्रक्‍टर होण्याची चांगली संधी आहे. काही तरुण या क्षेत्राकडे करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून वळत आहेत. व्यायाम करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे व मदत करण्यासाठी पर्सनल ट्रेनरची गरज पडते. जिममध्ये आलेल्याच्या वैयक्तिक तपशिलावरून व्यायाम ठरविण्याचे काम प्रोग्रॅमर करीत असतो. त्यामुळे या क्षेत्रात महिला व पुरुषांना समान रोजगाराच्या संधी आहेत. 

आधुनिक उपकरणांचा वापर 
जिममध्ये व्यायामासाठी विविध आधुनिक उपकरणांचा वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने कार्डिओ मशिन, पॉवर लिफ्टिंग, ॲब्डॉमिनल मशिन, लिव्हरेज, इंक्‍लाईन प्रेस, बारजॉगर, बुलवर्कर, डंबेल्स, स्टनिंग सायकल आदी साधनांचा समावेश आहे. वेटलॉस, वेटगन, बॉडीबिल्डिंग, जनरल फिटनेस, स्टीम बाथ अशी व्यायामाची वर्गवारी आहे. या उपकरणांनुसारच जिममध्ये शुल्क देखील आकारले जाते. यात तीनशे रुपयांपासून ते दोन हजारांपर्यंत महिन्याचे शुल्क आकारण्यात येते. तर काही ठिकाणी वार्षिक पॅकेज देखील देण्यात येत आहे.

नोकरदार महिलांचा वाढता कल 
आजच्या महागाईच्या काळात साठ टक्के महिला या नोकरदार आहेत. नोकरी करत असताना महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यातच अनेक महिलांना बसून काम असल्याने पाठीच्या व गुडघ्याच्या समस्या उद्‌भवतात. त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी महिलांचा जिमकडे कल वाढला आहे. जिममुळे महिलांचा लठ्‌ठपणा, पाठ, मानेचा त्रास आदींपासून मुक्ती मिळते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com