'गिरणा'च्या भांडारपालाकडे 21 लाखांची "अपसंपदा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

जळगाव - भ्रष्टाचाराची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आलेल्या चौकशीत गिरणा पाटबंधारे विभागाच्या निवृत्त भांडारपालाकडे सुमारे 21 लाखांची बेहिशेबी मालमत्ता आढळली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भांडारपालाची चौकशी करताना, त्याच्या सेवेच्या 28 वर्षे कार्यकाळातील मिळकतीच्या नोंदीही तपासल्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

गिरणा पाटबंधारे विभागात भांडारपालपदावरून निवृत्त झालेले भगवान पुंजाजी बोदडे (रा. वाघनगर) हे 2015 मध्ये निवृत्त झाले. त्यांच्याबद्दल तक्रार आल्यानंतर नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये त्यांची चौकशी सुरू होती. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या चौकशीत 7 मार्च 1980 ते 31 डिसेंबर 2008, अशा 28 वर्षांच्या कार्यकाळात वेळोवेळी त्यांच्यासह कुटुंबीयांच्या नावे भ्रष्टमार्गाने "अपसंपदा' संपादित केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

चौकशीत 20 लाख 27 हजार166 रुपयांची मालमत्ता आढळली आहे. त्यासाठी त्यांची पत्नी अलका बोदडे व मुलगा दिलीप बोदडे यांनी "अपसंपदा' संपादित करण्यासाठी भगवान बोदडे यांना साह्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले. परिणामी, भगवान बोदडे यांच्यासह पत्नी व मुलाविरुद्ध आज रामानंदनगर पोलिस ठाण्यात पोलिस उपअधीक्षक पराग सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: jalgav news 21 lakh property to stockman