जिल्हा बॅंकांच्या जुन्या नोटा स्वीकाराव्यात - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

चोपडा/जळगाव - नोटाबंदीच्या काळात जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये जमा झालेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅंकेने स्वीकारलेल्या नाहीत. त्यामुळे पीककर्ज देण्याची समस्या निर्माण झाली आहे. या वर्षी पाऊस चांगला होण्याचे संकेत आहेत. मात्र, पैशांअभावी शेतकरी अडचणीत येणार आहे. त्यामुळे त्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय ताबडतोब घेण्यात यावा, असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले आहे.

चोपडा येथे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, कविवर्य ना. धों. महानोर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शेतकरी अडचणीत
पवार म्हणाले, 'जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये जमा झालेल्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅंकेने अद्यापही स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा बॅंकांपुढे मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्यांच्याकडे पैसाच नसल्यामुळे ते शेतकऱ्यांना पीककर्जही देऊ शकत नाहीत. पैसा नसल्यामुळे शेतकरी शेतीहंगामासाठी लागणारे कोणतेही साहित्य घेऊ शकत नाही. या वर्षी पाऊस चांगला होणार आहे; परंतु शेतकऱ्याकडे पैसाच नसेल तर तो साहित्य कसे घेणार? त्यामुळे शेतकरी अडचणीत येणार आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी या संदर्भात शेतकऱ्यांची खाती तपासल्यानंतर निर्णय घेऊ, असे कळविले होते. रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तपासणी केली आहे. त्यामुळे आतातरी त्यांनी सहकारी बॅंकेतील पैसा स्वीकारून बॅंकांना निधी द्यावा.''

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की शेती; तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांची नोंद आपण घेतलेली आहे. आज त्याबाबत बोलण्याची वेळ नाही. तथापि, आपण त्या समस्यांवरील उपायांचा लवकरच उलगडा करणार आहोत.

दुधाचा एकच "ब्रॅंड' असावा
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की ज्या ठिकाणी शेतीला दूध व्यवसायाची पर्यायी जोड आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील दूध व्यवसायाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. दुधाला चांगला भाव मिळावा, यासाठी "महानंद'च्या माध्यमातून राज्यात दुधाचा "एकच ब्रॅंड' असावा. यासाठी शरद पवार व मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: jalgav news accept old notes of district banks