पहिली- आठवी तासिका विभागणीचे परिपत्रक रद्द करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

कला-शारीरिक शिक्षण शिक्षकांची मागणी; जिल्‍हाधिकारी कार्यालयसमोर परिपत्रकाची होळी
जळगाव - विद्या प्राधिकरण तथा आयुक्‍त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पहिली ते आठवीसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विषयवार तासिका विभागणी करण्याचे आदेश २७ एप्रिलला काढले आहेत. या आदेशामुळे आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाचा ५० टक्‍के कार्यभार कमी केल्याने या आदेशाचे परिपत्रक रद्द करण्याच्या मागणीसाठी कला व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीतर्फे आज (ता. २९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनादरम्यान जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी समितीतर्फे शासन परिपत्रकाची होळी करण्यात आली. या आंदोलनात एस. डी. भिरूड, प्रदीप साखरे, राजेश जाधव, अजय देशमुख, संजय निकम, सुहास चौधरी, जयांशु पोळ, पी. ए. पाटील, तुकाराम बोरोले, एच. जी. इंगळे, सी. डी. पाटील आदी उपस्थित होते. 

शैक्षणिक वर्ष २०१७- १८ पासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीचा कार्यभार निश्‍चित करण्यात आला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या पत्रकानुसार नववी व दहावीच्या तासिका निश्‍चित करण्यात आलेल्या आहे. तासिका निश्‍चित करताना कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या ५० टक्के तर कार्यानुभव विषयाचा २५ टक्के कार्यभार कमी करण्यात आला आहे. ही बाब या विषयासाठी व विषयांच्या शिक्षकांसाठी अन्यायकारक आहे. मूळ अभ्यासक्रमात या विषयांना प्रत्येकी आठ टक्के कार्यभार असून यानुसार प्रत्येक विषयासाठी चार तासिका देणे आवश्‍यक आहे. या तिन्ही विषयांच्या तासिकांमध्ये अन्यायकारक कपात करण्यात आलेली आहे. यामुळे शाळेत सेवेत असलेल्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांना कोणता कार्यभार द्यावा, हा प्रश्‍न शालेय प्रशासनासमोर आहे. इतर विषय अध्यापनासाठी शिक्षकांना दिल्यास त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आले.

अशा आहेत मागण्या
पहिली ते आठवी तासिका विभागणीचे परिपत्रक रद्द करा.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे अभ्यासक्रम/विषय योजना व तासिका नियोजनाचे २७ एप्रिलचे परिपत्रक रद्द करणे.
माध्यमिक शाळांमध्ये कार्यभारानुसार पूर्ण वेळ कला व शारीरिक शिक्षण शिक्षक नियुक्‍त करण्यात यावे. 
निवृत्तीनंतर देखील त्याच विषयाचे शिक्षक नियुक्‍त करावे.
संच मान्यतेमध्ये विशेष शिक्षक- कला स्वतंत्रपणे दर्शविण्यात यावे.
उच्च प्राथमिक शाळांमध्ये ७ ऑक्‍टोंबर २०१५ च्या अतिथी निदेशकांचे पथक नियुक्‍त करण्याबाबतचा शासन आदेश रद्द करा.

Web Title: jalgav news cancel the first eighth hourly division circular