कचरा, तुंबलेल्या गटारींमुळे आयुक्त निंबाळकर संतप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारपासून (११ जुलै) सकाळीच शहरातील विविध भागांत स्वच्छतेची पाहणी सुरू केली आहे. त्यांना जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता दिसली. संबंधितांना श्री. निंबाळकरांनी तंबी दिल्यानंतर या भागात नियमित स्वच्छता होत आहे की नाही यावर नागरिकांसह ‘सकाळ’ ठेवतोय लक्ष...

जळगाव - शहरातील अस्वच्छतेचा वाढत्या तक्रारीवरून विविध भागात सलग पाच दिवसापासून महापालिका आयुक्त म्हणून प्रभारी पदभार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर पाहणी करत आहे.

महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मंगळवारपासून (११ जुलै) सकाळीच शहरातील विविध भागांत स्वच्छतेची पाहणी सुरू केली आहे. त्यांना जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता दिसली. संबंधितांना श्री. निंबाळकरांनी तंबी दिल्यानंतर या भागात नियमित स्वच्छता होत आहे की नाही यावर नागरिकांसह ‘सकाळ’ ठेवतोय लक्ष...

जळगाव - शहरातील अस्वच्छतेचा वाढत्या तक्रारीवरून विविध भागात सलग पाच दिवसापासून महापालिका आयुक्त म्हणून प्रभारी पदभार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर पाहणी करत आहे.

यानुसार आज (ता. १५) गोलाणी मार्केट, शिवाजीनगरसह अन्य ठिकाणी केलेल्या पाहणीत अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करून गटारी तसेच रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  
जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त श्री. निंबाळकर यांनी आज महापौर नितीन लढ्ढा यांच्या वॉर्डांत येऊन पाहणीला सुरवात केली. नेहरू चौकातील तुंबलेल्या गटारी, पद्मालय रेस्ट हाउस मध्ये असलेला कचरा, जयकिसन वाडी मध्ये नागरिकांच्या घरांबाहेर कचरा, बांधकाम साहित्य पडलेले आढळून आले. गोलाणी मार्केटची सर्व पाहणी करून आरोग्य अधिकारी, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच शिवाजीनगर, बळिराम पेठ, सराफबाजार, नवी पेठ, इस्लामपुरा, रथ चौक, जोशी पेठ आदी ठिकाणी जाऊन स्वच्छतेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. 
 
पद्मालय विश्रामगृहात कचऱ्याचे दर्शन
आयुक्त निंबाळकर यांनी जयकिसन वाडी मधील पद्मालय विश्रामगृहामध्ये जाऊन पाहणी केली. विश्रामगृहात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसताच विश्रामगृहातील कर्मचाऱ्याची आयुक्तांनी कानउघाडणी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वच्छतेबाबत नोटीस काढण्याचे आदेश दिले. विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारासमोरील चहा टपरीचे अतिक्रमण काढण्याचे सूचना केल्या. तसेच विश्रामगृह समोरील इमारतीचा कचरा बोळीत अस्ताव्यस्त पडलेला आढळल्याने इमारतींच्या रहिवाशांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. 
  
टुरिस्ट हॉटेल समोर गटारी तुंबलेल्या
मेट्रो सिनेमागृहाच्या प्रवेशद्वार ते टुरिस्ट हॉटेल पर्यंत असलेल्या दुकानासमोरील गटारावर अखंड स्लॅब टाकला असल्याने त्या तुंबलेल्या अढळून आल्या. याबाबत नागरिकांनी सुद्धा आयुक्तांकडे तक्रार केल्यावर सर्व स्लॅब आजच्या आज तोडण्याचे आदेश अतिक्रमण विभागाचे अधीक्षक एच. एम. खान यांना दिले.

गोलाणीत अस्वच्छतेचे दर्शन
गोलाणी व्यापारी संकुलात सर्व विंग मध्ये जाऊन स्वच्छतेची पाहणी केली असता मार्केटमध्ये जागोजागी साचलेला ढीग, कचरा कुंड्यांच्या बाहेर कचरा, कचरा कुड्या गायब झालेल्या अढळून आल्या. तसेच संकुलातील चौथ्या मजल्यावरील रहिवाशांना समस्यांबाबत विचारणा केली. अस्वच्छता आढळलेल्या ठिकाणी रहिवाशांना स्वच्छता ठेवण्याची तंबी दिली. संकुलाच्या गच्चीवर दारूच्या बाटल्या, नळांना लागलेली गळती दिसून आली. 

अग्निशामक कार्यालयाची पाहणी
अग्निशामक दलाच्या कार्यालयात जाऊन बघितले असता स्वच्छता आढळली. परंतु बाहेर कचरा अढळून आला. कर्मचाऱ्यांनी संकुलातील गाळेधारक कचरा फेकतात असे सांगितले. अग्निशमन कार्यालयाच्या बाजूला असलेले गोलाणीचे प्रवेशद्वारातून जाताच हातगाड्या, फळ, भाजीपाला विक्रेत्यांचे वस्तूंचे अतिक्रमणातून मार्ग काढावा लागला. अतिक्रमण करणाऱ्यावर त्वरित कारवाईचे आदेश अतिक्रमण अधीक्षकांना दिले. 

दूषित पाणी, अस्वच्छतेच्या आयुक्तांकडे तक्रारी
गोलाणी संकुलानंतर वॉर्ड क्र. ३ मध्ये शिवाजीनगरला पाहणी केली. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी गटारीचे पाणी खुल्या भूखंडावर गटारीचे पाणी साचत असून याचा त्रास होत असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनी दूषित पाणी व सफाई होत नसल्याचे तक्रारी आयुक्तांकडे केल्या. त्यानंतर आयुक्तांनी बळिराम पेठ, सराफबाजार, नवी पेठ, इस्लामपुरा, रथ चौक जोशी पेठ येथे पाहणी केली. 

महापौरांना बोलावूनही आले नाहीत
महापौर नितीन लढ्ढा यांच्या वॉर्डात आज पाहणी केली जाणार होती. प्रभारी आयुक्त श्री. निंबाळकर हे महापालिका इमारतीजवळ आल्यावर आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांना महापौरांना फोन लावून पाहणीसाठी बोलावून घ्या असे सांगितले. आरोग्य अधिकारी यांनी फोन लावला असता महापौरांना तुम्ही पाहणी करून घ्या, असे सांगितले.

आयुक्तांच्या आदेशात आरोग्य अधिकाऱ्यांची आडकाठी 
मेट्रो सिनेमागृह ते टुरिस्ट हॉटेलपर्यंत असलेल्या गटारांवर स्लॅब असल्याने गटार तुंबत होती. याबाबत आयुक्त श्री.. निंबाळकर यांनी अतिक्रमण अधीक्षकांना आजच्या आज तोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार जेसीपी, ड्रिल मशिनच्या मदतीने स्लॅब तोडत असताना नगरसेविका पती प्रकाश बालाणी यांनी येऊन सर्व स्लॅब तोडण्यास विरोध दर्शवीत येण्या-जाण्यापुरती जागा सोडण्यासाठी सांगितले. आरोग्य अधिकाऱ्यांनी अतिक्रमण अधीक्षकांना सूचना केल्या. याबाबत अतिक्रमण अधीक्षकांनी सहाय्यक उपायुक्त डॉ. लक्ष्मीकांत कहार यांना अहवाल दिलेला आहे.

Web Title: jalgav news commissioner nimbalkar angry by garbage & dranage