गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत कमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

आढावा बैठक : प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची पोलिस अधीक्षकांची अधिकाऱ्यांना सूचना

जळगाव - जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील प्रभारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, अप्पर अधीक्षकांच्या उपस्थितीत गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याअंतर्गत दाखल असलेल्या, मात्र उघडकीस न आलेल्या गंभीर गुन्ह्यांबाबत प्रभारी अधिकाऱ्यांनी तपासाचा अहवाल सादर केला. त्याचबरोबर दोषारोप सिद्ध होण्याच्या प्रमाणावर बैठकीत चर्चा करण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी झाल्याचे बैठकीत निदर्शनास आले आहे. 

जिल्ह्यातील ३४ पोलिस ठाणे, आठ उपविभागाअंतर्गत आजमितीस उघडकीस न आलेल्या गंभीर गुन्ह्यात संबंधित तपासाधिकाऱ्यांनी केलेली कामगिरी व त्याच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात येणाऱ्या अडीअडचणींवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर दाखल गुन्ह्यांत न्यायालयात सुरू असलेल्या विविध खटल्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाले असून त्याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

न्यायातील पैरवी अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेत त्यांना पोलिस अधीक्षकांतर्फे योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक दत्तात्र्येय कराळे, अप्पर अधीक्षक बच्चनसिंग, प्रशांत बच्छाव, डीवायएसपी सचिन सांगळे, गुन्हेशाखेचे वरिष्ठ निरीक्षक राजेशसिंह चंदेल आदींची उपस्थिती होती. 

‘सीसीटीएनएस’वर सूचना 
राज्यशासनाच्या गृहविभागातर्फे ऑनलाइन गुन्हे रजिष्ट्रेशन पद्धती ‘सीसीटीएनएस’वर अधिकाधिक अपडेटेड माहिती संग्रहित करण्यावर बैठकीत जोर देण्यात आला असून तपासावर असलेल्या गुन्ह्यात आणि दोषारोप पत्र सादर होणाऱ्या गुन्ह्यातील सर्व कागदपत्रे संग्रहित करुन दाखल गुन्ह्यांची तत्काळ नोंद सीसीटीएनएस प्रणालीवर नमूद करण्याच्या सूचना उपस्थित प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. 

पाच पोलिस ठाण्यांना मॉडेल दर्जा देण्याचा प्रयत्‍न
जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांना मॉडेल पोलिस ठाण्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यात औद्योगिक वसाहत पोलिस ठाणे, सावदा, नशिराबाद, मेहुणबारे, अडावद पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. या सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील जनसंपर्क, गुन्ह्यांचा निपटारा करण्याची गतिमान यंत्रणा, अचूक आणि त्रुटींविरहित कार्यप्रणालीवर भर देण्यात येत असून, त्याचा संपूर्ण लेखाजोखा महासंचालक कार्यालय व गृह विभागाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती अप्पर अधीक्षक बच्चनसिंग यांनी दिली. 

गुन्हे उघड करण्यावर भर 
जिल्ह्यात आजमितीस दहा ते अकरा गंभीर व खुनाचे गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नसून, त्यांच्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना संबंधित डीवायएसपी, अप्पर अधीक्षक आणि प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. भादली खून प्रकरण, नीलेश भिल बेपत्ता प्रकरणात अधिक गतिमान तपासासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Web Title: jalgav news The crime rate proved to be lower than last year