अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालये गजबजली!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

शहरात साडेसात हजार जागा; चलन भरण्यासाठी विद्यार्थ्यांची कसरत
जळगाव - दहावीच्या विद्यार्थ्यांना नुकतीच गुणपत्रिका देण्यात आल्याने आजपासून शहरात अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरवात झाली आहे. यंदा अकरावीसाठी सात हजार ५५० जागा उपलब्ध आहेत. त्यात चार हजार ८९५ जागा अनुदानित तुकड्यांसाठी, तर दोन हजार ६५५ जागा विनाअनुदानित तुकड्यांसाठी उपलब्ध असल्याने, आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती.

दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यंदा वाढली आहे. शहरात अकरावी प्रवेशासाठी कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांसाठी ७० तुकड्या आहेत. त्यात ४४ तुकड्या अनुदानित, तर २६ तुकड्या विनाअनुदानित आहेत. त्यामुळे आज विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गर्दी केली होती. यात धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, मू. जे. महाविद्यालय, बेंडाळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. 

चलन भरण्यासाठी कसरत
अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेला सुरवात झाल्याने इतर वर्गांसह एकच गर्दी वाढली होती. त्यामुळे आज चलन भरताना विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली. यातच मू. जे. महाविद्यालयात प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी असणारी खिडकी व चलन भरण्यासाठी असलेली खिडकी दूर असल्याने विद्यार्थ्यांची फिराफीर झाली. तासन्‌तास विद्यार्थ्यांनी रांगेत उभे राहून चलन भरले.
 
‘मेरिट’चा वाढणार टक्का
यंदाच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळाल्याने, विज्ञान व वाणिज्य या शाखांसाठी लागणाऱ्या ‘मेरिट’चा टक्का वाढणार आहे. गेल्या काही वर्षांत गुणवंत विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे ओढा वाढल्याने, अकरावी कला शाखेला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान, गतवर्षी विज्ञान व वाणिज्य या शाखांची गुणवत्ता यादी लावण्यात आली होती. यंदा कला शाखेलाही लागण्याची शक्‍यता महाविद्यालयातर्फे वर्तविण्यात आली आहे.

Web Title: jalgav news crowd for college eleventh admission