चिमुकल्यांनी साकारल्या शाडूच्या आकर्षक गणेशमूर्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

‘सकाळ- एनआयई’, कुतूहल फाउंडेशनचा उपक्रम; पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग

‘सकाळ- एनआयई’, कुतूहल फाउंडेशनचा उपक्रम; पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग

जळगाव - मनातील विचारांना आकाराचे रूप देत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्तीची अनेक रूपे साकारून आपल्यातील अनोख्या कलाविष्कारांचे सादरीकरण केले. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) व्यासपीठ व कुतूहल फाउंडेशनतर्फे आयोजित ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती’ बनविण्याच्या कार्यशाळेचे. 
शहरातील प. न. लुंकड कन्या शाळेच्या मैदानावर आज सकाळी ही कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे युनिट मॅनेजर संजय पागे, वितरण व्यवस्थापक प्रमोद पाटील, कुतूहल फाउंडेशनचे संचालक महेश गोरडे आदी उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांनी स्वत: पर्यावरणपूरक गणपती तयार करून ते आपल्या घरी स्थापन करावेत, या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. प्रशिक्षक अनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना अवघ्या दहा मिनिटांत शाडू मातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. स्वत:च्या हाताने गणेशमूर्ती तयार करताना विद्यार्थ्यांमध्ये उत्साह कायम होता. यावेळी शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांसोबतच यावेळी पालकांनीदेखील गणेशमूर्ती साकारल्या.

विद्यार्थी, पालकांचे बोल...

आजकाल लहान मुले ही मातीतील खेळ विसरली आहेत. मात्र या कार्यशाळेच्या निमित्ताने बालगोपाळांनी मातीत खेळून पर्यावरणपूरक अशा सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. बालगोपाळांना शिकवताना खूप आनंद झाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या हाताला व मेंदूला नवा आकार मिळाला.
- अनिता पाटील (प्रशिक्षक)

‘एनआयई’च्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळत आहे. विद्यार्थ्यांना स्वत: वस्तू तयार करून आपल्यातील कला साकारण्याची संधी या माध्यमातून मिळत आहे. 
- रीना शिंदे (पालक)

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारणे यांसारख्या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खूप शिकायला मिळत आहे. आज माझ्या मुलाने प्रथमच स्वत:च्या हाताने गणपती तयार केल्याने खूप आनंद वाटला. 
- ललित महाजन (पालक)

गणेशमूर्ती साकारताना खूप मजा आली. पहिल्यांदाच शाडू मातीचा गणपती तयार करायला मिळाल्याने आनंद झाला. मूर्ती साकारताना मला मित्रांनीदेखील मदत केली. या उपक्रमाचा मी मनापासून आनंद लुटला.
- ओम राजपूत (विद्यार्थी)

गणेशमूर्ती तयार करताना खूप छान वाटले. मी पहिल्यांदाच स्वत:च्या हाताने गणपती तयार केला आहे त्यामुळे खूप आनंद वाटला. मी हाच गणपती घरीदेखील बसवणार आहे.
- धनंजय जोशी (विद्यार्थी)

पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कार्यशाळेत सहभागी झालो. गणेशमूर्ती बनविण्याचा अनुभव वेगळाच होता, खूप मजा आली. प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार केलेली मूर्ती घरी नेऊन तिची पूजा करू. 
- साई राजपूत (विद्यार्थी)

आज पहिल्यांदाच गणपती तयार केल्यामुळे खूप आनंद वाटतोय. याठिकाणी मी माझ्या नवीन मैत्रिणींसोबत गणपती तयार केला. गणपती घरी नेता येत असल्यामुळे मला खूप छान वाटतेय.
- गार्गी खैरनार (विद्यार्थिनी)

गणेशमूर्ती तयार करताना खूप छान वाटले. मी या बाप्पाप्रमाणेच घरी मोठा गणपती तयार करण्याचा प्रयत्न करेल व दरवर्षी स्वत: तयार केलेल्या गणेशमूर्तीची स्थापना करेल.
- गायत्री चौधरी (विद्यार्थिनी)

शाडूमातीची गणेशमूर्ती साकारताना खूप मजा आली. याठिकाणी मला नवीन मैत्रिणी देखील भेटल्या. त्यांच्यासमवेत मी गणपती तयार केला. यंदा मी माझ्या घरी याच मूर्तीची स्थापना करेल. 
- स्नेहा सोनवणे (विद्यार्थिनी)

सर्व शाळांचा सहभाग
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याच्या या कार्यशाळेत शहरातील ‘एनआयई’ सभासदांसह सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

मूर्तीसोबत ‘सेल्फी’चा आनंद
काही पालकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये गणेशमूर्ती साकारतानाची चित्रफीत केली, तर काही पालकांनी आपल्या मुलाचे गणपती तयार करतानाचे फोटोदेखील काढले.

Web Title: jalgav news ganeshmurti making by shadu soil