दरमहा ६७ लाख खर्चूनही उकिरडे जैसे थे!

दरमहा ६७ लाख खर्चूनही उकिरडे जैसे थे!

‘जळगाव फर्स्ट’च्या सर्वेक्षणातून समोर आले अस्वच्छतेचे विदारक चित्र; सातशेवर छायाचित्रे प्राप्त

जळगाव - शहरातील ‘जळगाव फर्स्ट’ या सेवाभावी व स्वयंसेवी संघटनेतर्फे आज शहरातील साफसफाईच्या कामांचे ‘सोशल पब्लिक ऑडिट’ करण्यात आले. ‘जळगाव फर्स्ट’च्या अभियानात शहरातील विविध भागांतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत शहरातील अस्वच्छतेचे दर्शन घडविणारी शेकडो छायाचित्रे पाठवली. त्यातून शहराच्या सफाईच्या ठेक्‍याचा व कामाचा उडालेला बोजवारा समोर आला. 

रविवारी सकाळी सहा ते दहा या वेळेत शहरातील महापालिकेच्या ३७ प्रभागांपैकी २२ प्रभागांमध्ये ठेक्‍याच्या, तर १५ प्रभागांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या स्वच्छतेच्या कामांचे ‘सोशल पब्लिक ऑडिट’ करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ‘जळगाव फर्स्ट’च्या स्वयंसेवकांनी आपापल्या प्रभागात स्थळपाहणी करून सर्वेक्षणाअंती अस्वच्छ गटारे, रस्ते, तुंबलेल्या कचराकुंड्या, अरुंद नाले आदींची छायाचित्रे ‘जळगाव फर्स्ट’च्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर टाकून महापालिकेच्या सफाईचे दावे फोल असल्याचे सिद्ध केले आहे. 

ठिकठिकाणी उकिरडे
शहरातील चारही प्रभागांमध्ये सर्वत्र घाणीचे उकिरडे असल्याचे चित्र समोर आले.  या भागांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष स्वयंसेवकांना भेटून, तसेच फोनवरून केल्या आहेत. एकूणच कमी झाडू कामगार, गटार कामगारांकडून प्रभागांची स्वच्छता करून घेण्याचा प्रकार सुरू असल्याने दोन- तीन दिवसांआड साफसफाई होत आहे, तर अनेक भागात तर आठ-आठ दिवस सफाई कामगार फिरकतही नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. 

सर्वेक्षणात यांचा सहभाग
या सर्वेक्षण अभियानात जळगाव फर्स्टचे प्रणेते डॉ. राधेश्‍याम चौधरी, अशफाक पिंजारी, डॉ. विकास निकम, अनिल साळुंखे, विशाल वाघ, राकेश पाटील, बी.एन. चौधरी, संदीप पाटील, संदीप पवार, मनोज चौधरी, राजेंद्र महाजन, सतीश वाणी, कय्यूम देशमुख, बाबूलाल चौधरी, अजय पाटील, सुश्‍मिता भालेराव, पुरुषोत्तम पाटील, आशिक जोहरे, अनिल साळुंखे, विजय राठोड, योगेश पाटील, विशाल पवार, दानिश अहमद, मतीन पटेल, रज्जाक पटेल, सुभाष ठाकरे, संजय राजपूत, इमरान शेख, मिलिंद पितळे आदींनी परिश्रम घेतले.

दरमहा ६७ लाखांचा खर्च जातो कुठे?
जळगाव महापालिका सफाई कामासाठी दर महिन्याला सुमारे ६७ लाख रुपये खर्च करीत असताना त्यात एकेका मक्तेदाराला तीन लाखांपेक्षा अधिक पेमेंट अदा केले जात असताना स्वच्छतेची स्थिती अत्यंत वाईट आहे. केवळ स्वच्छतेवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही शहराची सफाई होत नाही, मग हा खर्च नेमका जातो कुठे? असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे.

आकडे बोलतात...
७५ टक्के शहराच्या भागातून सर्वेक्षण
एकूण छायाचित्रे प्राप्त    ७४६
गट १    ५८
गट २    ११८
गट ३    १२६
गट ४    ७४
गट ५    १०२
गट ६    २६०
स्वयंसेवक कार्यरत    ४८
कार्यवाहीची गरज असलेली ठिकाणे    ६९६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com