अखेर घनश्‍याम पाटीलची शरणागती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

१० गंभीर गुन्हे; ‘स्थानबद्ध’ आदेशानंतर चार महिने होता फरारी

१० गंभीर गुन्हे; ‘स्थानबद्ध’ आदेशानंतर चार महिने होता फरारी
जळगाव - अमळनेर येथील वाळूमाफिया, दहा विविध गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार घनश्‍याम ऊर्फ श्‍यामकांत जयवंतराव पाटील (वय ३२) अखेर आज पोलिसांना शरण आला. अमळनेरचे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी संशयित ताब्यात आल्याची खात्री दिल्यावर १५ फेब्रुवारी २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी एमपीडीएच्या कारवाई संदर्भातील प्रस्तावावर स्वाक्षरी करून एकवर्ष स्थानबद्धतेचा आदेश पारीत केला होता. त्यानंतर अचानक ताब्यात असलेला संशयित अटक नसल्याची बोंब पोलिसांनी उठवल्याने एकच गोंधळ माजला होता. चार महिने पोलिस त्याचा शोध घेऊ शकले नाही. अखेर तो स्वत: पोलिसांना शरण आला.  

अमळनेरच्या पटवारी कॉलनीतील रहिवासी घनश्‍याम ऊर्फ श्‍यामकांत जयवंतराव पाटील (वय-३२) याच्याविरुद्ध अवैध वाळू चोरी (४ गुन्हे), शासकीय नोकरांवर हल्ले (३ गुन्हे), जमावबंदी आदेशाचे उल्लंघन (२+२ गुन्हे), गर्दी करून दंगल घडवणे (१ गुन्हा), जातिवाचक शिवीगाळ, ठार मारण्याची धमकी असे एकूण दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून १५ फेब्रुवारी रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले होते. घनश्‍याम पाटील हा आपल्या ताब्यात असल्याचे अमळनेरचे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी खात्री दिल्यावर नोटीस जारी करण्यात आली होती. मात्र, नंतर घनश्‍याम ताब्यातच नसल्याचे पोलिसांनी कळविल्याने पोलिस दलात एकच गोंधळ उडाला. या प्रकरणात निरीक्षक वाघ यांना एक दिवसासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलिस नियंत्रण कक्षात हलविले होते होते. या प्रकरणाची चौकशी होऊन नोटीस घेऊन जाणारे अमळनेरचे पोलिस पथक आणि गुन्हेशाखेचे कर्मचारी यांची चौकशी झाली. त्यांनी थेट पोलिस अधीक्षकांनाच मोबाईल रेकॉर्डिंग ऐकवून खात्री करून दिल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली होती. 

गुन्हेशाखेने पछाडले जंगजंग 
‘एमपीडीए’चा संशयित पसार झाल्याने गुन्हेशाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी विशेष पथके गठित करून औरंगाबाद, नाशिक, धुळे, ठाणे, मुंबई आणि मध्यप्रदेशात संशयिताचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. स्थानिक अमळनेर पोलिसही त्याचा शोध घेण्यात अपयशी ठरले. अखेर त्याने औरंगाबाद उच्च न्यायालयात जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या कारवाईविरोधात अपील (रिट पिटिशन क्र.३३५/२०१७) दाखल केले होते. ते खंडपीठाने नुकतेच फेटाळून लावल्याने आज चार महिने उलटल्यावर घनश्‍याम ऊर्फ श्‍यामकांत जयवंतराव पाटील स्वत:हून हजर झाला. त्याची वैद्यकीय तपासणी करून नाशिक कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

मालमत्ता जप्तीची नोटीस
संशयित घनश्‍याम मिळून येत नसल्याने अखेर पोलिसांनी ३० मार्च २०१७ रोजी त्याच्या पटवारी कॉलनीतील राहत्या घरावर नोटीस डकविली होती. तरी सुद्धा संशयित गेली तीन महिने पोलिसांना चकवा देत सुरक्षितस्थळी भूमिगत राहिला. तो पोलिसांना मिळून आला नाही, याची चर्चा अमळनेरसह जिल्हा पोलिसदलात होती.

या कायद्यान्वये कारवाई 
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती व द्रृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन, वाळू तस्कर, अत्यावश्‍यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातककृत्याना आळा घालणेबाबतच्या सन-१९८१ सुधारणा अधिनियम १९१५ चे ३(३) अन्वये जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या स्वाक्षरीने कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: jalgav news ghanshyam patil surrender