शहरातील रस्ते गेले खड्ड्यांत..!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पावसाने दुरवस्था; दुरुस्तीचे सव्वा कोटी पाण्यात

जळगाव - महिनाभर तुरळक पाऊस झाल्यानंतर दोन दिवसांपासून शहरात झालेल्या दमदार पावसाने रस्त्यांची वाट लावली आहे. जूनपूर्वी शहरातील काही प्रमुख मार्गांवर तात्पुरत्या दुरुस्तीचे काम झाले होते. मात्र, या कामाचा दर्जा बघता पहिल्याच पावसात रस्त्यांची वाट लागणार, हे निश्‍चित होते. झालेही तसेच आणि या रस्त्यांच्या दुरुस्तीवरील जवळपास सव्वा कोटीचा खर्च पाण्यात जाण्याच्या मार्गावर आहे.

आर्थिक स्थिती बिकट असल्याचे कारण पुढे करत महापालिका प्रशासन नागरी सुविधा पुरविण्याच्या कर्तव्यापासून अंग चोरण्याचा प्रयत्न करीत आहे. अशातच शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने हे रस्ते चांगले कधी होतील, याची नागरिकांना प्रतीक्षा होती. अमृत योजनेचे त्रांगडे न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहे, त्यामुळे या योजनेच्या पूर्णत्वानंतरच रस्त्याची कामे हाती घेण्याबाबत शासनाने आदेशित केले आहे. असे असताना, रस्त्यांमधील खड्ड्यांच्या समस्येने वाहनधारकांना ग्रासले होते.

शहरातील प्रमुख तसेच प्रभागांतर्गत उपरस्त्यांची अवस्था सारखीच झाली होती. त्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली होती. 

पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती
दरम्यान, महापालिका प्रशासनाने रस्ता दुरुस्तीवर ‘गंभीर’ होत हा प्रश्‍न पावसाळ्यापूर्वी मार्गी लावला. प्रभाग समिती अंतर्गत विविध भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीवर ६० लाख रुपये तर प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ७५ लाखांची तरतूद करून रस्ता दुरुस्ती, काही ठिकाणी पॅचवर्क करण्यात आले. गेल्या आठवड्यातील स्थायी समितीच्या सभेत डांबर खरेदीवरून वाद झाला, यात मोठा ‘झोल’ झाल्याचे आरोप झाले होते. 

दुरुस्तीचा खर्च पाण्यात
आता दोन दिवसांत जळगाव शहरात चांगला पाऊस झाल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ज्या खड्ड्यांवर ‘पॅचवर्क’ करण्यात आले होते, त्यांची अवस्थाही तीच झाली आहे. त्यामुळे पॅचवर्क व दुरुस्तीवरील खर्च पूर्णत: पाण्यात गेल्याची बोंब उठत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच चांगला पाऊस झाला आणि त्यातच रस्त्यांची वाट लागली. पावसाळ्याचे आणखी दोन महिने बाकी आहेत, त्यात मुसळधार पाऊस झाल्यास रस्त्यांची अवस्था आणखीच बिकट होईल. त्यामुळे पावसाळ्यानंतर तरी अमृत व रस्ते विकासाची कामे मार्गी लागावीत आणि चांगल्या दर्जाचे काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: jalgav news hollow on road in jalgav