भारनियमन नव्हे; विजेचा लपंडाव

जळगाव - पारिख पार्क उद्यानाजवळ वीजतारांमध्ये अडकलेल्या झाडाच्या फांद्या.
जळगाव - पारिख पार्क उद्यानाजवळ वीजतारांमध्ये अडकलेल्या झाडाच्या फांद्या.

‘महावितरण’च्या मॉन्सूनपूर्व कामाचा बोजवारा; पाऊस येताच उद्‌भवतेय समस्या

जळगाव - मॉन्सूनपूर्व तयारीचा दावा करणाऱ्या वीज वितरण कंपनीचे पितळ पहिल्याच पावसात उघडे झाले. शहराच्या अनेक भागांसह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. देखभाल, दुरुस्तीचे काम अजूनही सुरू असल्याचे सांगत महावितरण हात झटकून मोकळी होत आहे. उन्हाळ्यात ग्राहकांना भारनियमनाच्या मिळालेल्या झटक्‍यानंतर आता विजेच्या लपंडावाचा खेळ सुरू असून, यात ग्राहकच भरडला जात आहे.

मॉन्सूनचे आगमन होण्यापूर्वी वीज वितरणात अडथळे येऊ नये, याकरिता ‘महावितरण’कडून मॉन्सूनपूर्व दुरुस्तीचे नियोजन आखण्यात येत असते. हे नियोजन दरवर्षी केले जाते, पण दरवर्षीच पावसाला सुरवात झाल्यानंतर वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार नवीन राहिलेले नाही. यंदा देखील जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागते. तरी देखील ‘महावितरण’च्या या कारभारात वर्षानुवर्षे सुधारणा करण्याचे नियोजन आखण्यात आलेले नाही. दुरुस्ती केल्यानंतर देखील पावसाळ्याच्या दिवसात उद्‌भवणारी आपत्कालीन व्यवस्था सोडविण्यासाठी हवी ती यंत्रणा ‘महावितरण’कडे उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

पहिल्याच पावसाने पितळ उघडे
मॉन्सूनला सुरवात होण्यास अजून प्रतीक्षा आहे. परंतु, गेल्या आठवड्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने ‘महावितरण’चा बोजवारा उडविला. महिनाभरापूर्वी मॉन्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामांचे नियोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने तारांना अडणाऱ्या फांद्या छाटणे, डीपीमधील ऑईलची लेव्हल तपासणी, फ्यूज पेट्या दुरुस्ती, लोंबकळणाऱ्या व जीर्ण तारांची दुरुस्ती, पोल दुरुस्ती, इंन्सुलेटर्स टाकणे, अर्थिंग तपासणी यासारख्या कामांचे नियोजन आखण्यात आले होते. परंतु, अगदी पावसाची रिपरिप सुरू झाल्यानंतर देखील वीजपुरवठा खंडित झाल्याचा अनुभव वीज ग्राहकांना आला आहे. मॉन्सूनपूर्व तयारीचा दावा करणाऱ्या महावितरणच्या भागात वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात यंदा वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात भारनियमन तर सुरू झाले नाही ना; अशीच शंका उपस्थित होत आहे.

लाखो रुपयांचा खर्च, तरी उपकेंद्रांचे काम अपूर्णच 
मॉन्सून सक्रिय होण्यापूर्वी वीज वितरणाचे जाळे तपासले जाते. सोबतच वीज उपकेंद्राची देखभाल व दुरुस्ती केली जाते. मात्र, यंदा जिल्ह्यातील अनेक उपकेंद्रांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे अपूर्ण आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दुरुस्तीच्या कामांसाठी लाखो रुपये खर्च केला जातो. तरी देखील समस्या सुटत नसल्याचे चित्र दरवर्षी पाहण्यास मिळते. मुळात यंदाच्या कामाचे नियोजन हे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून करण्यात आले असल्याने अजूनही काम अपूर्ण राहिले आहे.

‘महावितरण’कडून दुरुस्तीच्या कामांचे नियोजन हे एप्रिल महिन्यातच झाले, तर निश्‍चितच काम पूर्ण होऊन जिल्ह्यात पावसाचे आगमन होताच गुल होणारा वीजपुरवठा सुरळीत राहू शकेल.

नवीपेठ परिसर तीन दिवस अंधारात
गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानंतर लगेच संपूर्ण शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. रात्रीच्यावेळी खंडित झालेली वीज सकाळीच सुरू करण्यात येत होती. यामुळे या आठवड्यात जळगावकरांना किमान तीन- चार रात्री या विजेविनाच काढाव्या लागल्या आहेत. नवीपेठ परिसरासह गोलाणी मार्केट परिसरात तर गेल्या आठवड्यातील किमान तीन दिवस वीज पुरवठा बंदच होता. तर या परिसराला जोडणारी केबल गेल्या रविवारी (ता. ११) दुपारी तुटली असताना ती जोडण्याचे काम अगदी दुसऱ्या दिवसावर लोटण्यात आले होते. 
 

मॉन्सूनपूर्व दुरुस्तीच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार कामे झाली आहेत. परंतु वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यास विजेच्या लाइनमध्ये फॉल्ट होतो. रात्रीच्या वेळी वीजप्रवाह बंद राहू नये याकरिता शहरात स्वतंत्र गाडी देऊन यातील कर्मचारी बिघाड तत्काळ दुरुस्त करतील, अशी व्यवस्था आहे.
- दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता, जळगाव मंडळ, महावितरण
 

वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे
पावसाळ्याच्या दिवसात झाडांच्या फांद्या वीजतारांमध्ये अडकून किंवा फांद्या तुटल्याने शॉर्टसर्किट होतो. शिवाय वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यास रोहित्रात बिघाड, फ्यूज जाणे, डिस्क इन्सुलेटर किंवा पिन इन्सुलेटर पंक्‍चर होणे, चिनी मातीचे इन्सुलेटर गरम होऊन त्यात पाणी गेल्याने तडे पडून, सर्व्हिस वायर व जंपरवर कार्बन चढणे, सर्व्हिस वायर जोडणी ढिली होणे यासारख्या कारणांमुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असतो. ‘महावितरण’ला हे सारे कारणे माहीत असताना देखील यातील दुरुस्ती करण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com