जळगावसह अमळनेर, पारोळा, पिलखोडला पाऊस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हजेरी; शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण

जळगाव - गेल्या पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज जिल्ह्यातील जळगाव शहरासह अमळनेर, पारोळा, तसेच चाळीसगाव तालुक्‍यातील पिलखोड परिसरात पावसाने दुपारी हजेरी लावली. जळगावात तुरळक, अमळनेरला मध्यम, पारोळ्यात मुसळधार, तर पिलखोड परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हजेरी; शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण

जळगाव - गेल्या पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज जिल्ह्यातील जळगाव शहरासह अमळनेर, पारोळा, तसेच चाळीसगाव तालुक्‍यातील पिलखोड परिसरात पावसाने दुपारी हजेरी लावली. जळगावात तुरळक, अमळनेरला मध्यम, पारोळ्यात मुसळधार, तर पिलखोड परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगावात तुरळक पाऊस
जळगाव शहरातील विविध उपनगरे व कॉलनी परिसरात आज दुपारी अडीच-तीनच्या सुमारास पंधरा ते वीस मिनिटे पाऊस पडला. यावेळी काही वेळ जोरदार वादळी वाराही सुटला होता. त्यामुळे काही वेळ वीजपुरवठा खंडित राहिला.

अमळनेरला मध्यम पाऊस
अमळनेर येथे दुपारी दीडच्या सुमारास शहर व परिसरातील काही गावांमध्ये पाऊस पडला. सुमारे अर्धातास पाऊस झाला. त्यानंतर बराच वेळ रिपरिप सुरू होती. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांमध्ये काही अंशी समाधान असले, तरी खरिपासाठी दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. 

पारोळ्यात मुसळधार
पारोळा शहरासह परिसरात आज दुपारी सुमारे एक तास पाऊस पडला. शेवगे, चोरवड, मंगरूळ, धूळपिंप्री, म्हसवे आदी परिसरात मुसळधार पाऊस पडला. पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. शेवगे व परिसरात मुसळधार पावसाने नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. शेतीच्या खोळंबलेल्या कामांनाही आता वेग येणार आहे. खरीप लागवड झालेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. शेवगे बुद्रुक परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने नाल्याला पाणी आले होते. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकही काही वेळ खोळंबली.

पिलखोडला पिकांना जीवदान
पिलखोड (ता. चाळीसगाव) परिसरात आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. शेती शिवारात बहुतांश भागात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. पाऊस सुरू असताना काही वेळ वादळ आल्यामुळे तळणी भागात एका घराची पत्रे उडाली. पिलखोडसह परिसरातील सायगाव, मांदुर्णे व उपखेडच्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. आज सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत असतानाच दुपारी सव्वाचारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. सुमारे पाऊण तास चांगला पाऊस झाला. या पावसामुळे शेती शिवार पाण्याने भरलेली दिसून आले. सुरवातीचे पंधरा मिनिटे पाऊस स्थिर होता. त्यानंतर वादळी वारा सुरू झाला. वादळात शेती शिवारातील अनेक झाडे उन्मळून पडली. दरम्यान, कापूस व मका पिकांना पावसामुळे जीवनदान मिळाले आहे.

तळणी भागात पत्रे उडाली 
येथून जवळच असलेल्या तळणी भागात वादळी पावसामुळे पंढरीनाथ सोनवणे यांच्या घराची पत्रे उडाली. श्री. सोनवणे यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. त्यांच्या नव्या घराचे काम सुरू असताना ही पत्रे उडाल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. त्यांना मदतीची मागणी होत आहे. 

वीजपुरवठा खंडित 
तळणी भागात दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे येथील ग्रामस्थांची विजेअभावी गैरसोय होत आहे. ‘सिंगल फेज’ने या भागात वीजपुरवठा केला जातो. ग्रामस्थांनी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही कोणी दखल घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: jalgav news rain