गुजरातहून नागपूरला जाणारा ट्रक जळगावातून गायब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

जळगाव - भरुच (गुजरात) येथील विलायत इंडस्ट्रीजमधून नागपूरच्या कंपनीला जाणारा सुमारे २५ लाख १५ हजार ३७८ रुपयांचा ‘सिंथेटिक फायबर’चा माल जळगावात आल्यानंतर ट्रकसह गायब झाला होता.

जळगाव - भरुच (गुजरात) येथील विलायत इंडस्ट्रीजमधून नागपूरच्या कंपनीला जाणारा सुमारे २५ लाख १५ हजार ३७८ रुपयांचा ‘सिंथेटिक फायबर’चा माल जळगावात आल्यानंतर ट्रकसह गायब झाला होता.

औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या ‘डीबी’ पथकातील कर्मचाऱ्याला मालाची दोन ट्रकमधून विल्हेवाट लावत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून चौकशी केली असता, हा माल चोरीचा असल्याचे निष्पन्न झाले. हा माल परस्पर दोन वेगवेगळ्या ट्रकमध्ये भरून पसार होत असतानाच पोलिस पथकाने वाहनांवर झडप घालत दोन्ही ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले, तर दुसरा चालक फरारी झाला. दरम्यान, मूळ ट्रकची विल्हेवाट लावण्यात चोरटा यशस्वी ठरला. मात्र, मूळ ट्रकचा शोधही अजूनही लागलेला नाही.

भौगोलिक नकाशावर महत्त्वपूर्ण असलेला जळगाव जिल्हा चोर, लुटारूंसाठीही ‘जंक्‍शन’ बनत आहे. काही महिन्यांपूर्वी एक कोटी रुपयांची वीजकेबल असलेला ट्रक चोरट्यांनी पळवला होता. त्यापूर्वी तेलाचा ट्रक मालासह लंपास झाला होता. आज चक्क २५ लाख १५ हजार ३७८ रुपयांचा माल व दहा लाखांचा ट्रक असा सुमारे ३५ लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. मात्र, गुन्हे शोध पथकातील अश्रफ शेख या कर्मचाऱ्याची चाणाक्षवृत्ती आणि कुतूहलातून गुन्हा उघडकीस आला आहे. चोरीची खात्री झाल्यावर पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या पथकातील उपनिरीक्षक रोहन खंडागळे, कर्मचारी सचिन मुंडे, अशरफ शेख, ठाकरे, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत यांच्या पथकाने गुन्ह्याचा छडा लावून मालासह दोन ट्रक (एमएच ०४, सीयू २०८ व एमएच ०४ सीयू ९८६०) ताब्यात घेतले आहेत. ट्रकचालक तस्लिम खान अय्युबखान (रा. पाळधी, ता. धरणगाव) याला अटक करण्यात आली असून, फिरोज खान जाफरउल्ला खान (रा. गिट्टी खदान, नागपूर) पसार झाला आहे. श्री भगीरथ टेक्‍स्टाइल लिमिटेड (कोहळी, ता. कळमेश्‍वर, जि. नागपूर) कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश भीमराव मंडलिक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.मूळ ट्रकचाच शोध...

नागपूरच्या भगीरथ टेक्‍स्टाइल कंपनीने गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील ‘विलायत इंडस्ट्रीज इस्टेट’ येथून मागवलेला सिंथेटिक व्हिस्कोस स्टेपल फायबरचा २५ लाख १५ हजार ३७८ रुपये किमतीचा माल घेऊन ‘प्रीत रोडवेज्‌ गुड्‌स कॅरिअर ट्रान्स्पोर्ट’चा ट्रक (सीजी ०४, जेबी १४७९) २८ जून २०१७ ला सायंकाळी पाचला निघाला. माल चार दिवसांत, अर्थात एक जुलैला नागपूर येथे पोचणे अपेक्षित होते. मात्र पाच जुलै उलटूनही ट्रक पोचला नाही.

त्यामुळे चौकशी सुरू झाली. प्रीत ट्रान्स्पोर्टचे मालक भूपिंदरसिंग माकन यांना सोबत घेत कंपनी व्यवस्थापक प्रकाश मंडलिक, चालक दीपक चौत्राम यादव, कंपनीचे कर्मचारी राजू भिस्सीकर असे गाडीच्या शोधार्थ १६ जुलैपासून निघाले होते. मात्र गाडी मिळून आली नाही. बाळापूर येथे शोध घेत असताना जळगाव पोलिसांचा फोन आल्यावर त्यांनी जळगाव गाठत खात्री केली.

ट्रकचालकांची ‘शाळा’...?
‘प्रीत गुड्‌स कॅरिअर’ या ट्रान्सपोर्टवरील ट्रकचालक दीपक चैत्राम यादव याने, गुजरात येथे माल भरण्यासाठी गाडी उभी केली आणि त्याच्या सासूची तब्येत गंभीर असल्याचा निरोप मिळाल्याने त्याने नवीन चालक म्हणून प्रीत ट्रान्सपोर्टचाच सुरेश यादव याला ट्रक सोपवून रेल्वेने नागपूर गाठले. सुरेश यादवने मात्र नागपूर जाण्याऐवजी जळगावातच शाळा भरवून मालाची विल्हेवाट लावली की त्यालाच मालासह त्याचे बरे-वाईट करण्यात आले, याचा पोलिस शोध घेत आहेत. 

चिठ्ठीमुळे ‘जीएसटी’चा बहाणा फसला
ट्रकमध्ये दोन तासांपासून माल क्रॉसिंग होत असल्याचे अश्रफ शेख या पोलिस कर्मचाऱ्याला एकाने सांगितले. त्या माहितीवरून पाळत ठेवली असता संशय आल्याने त्यांनी निरीक्षक सुनील कुराडे यांना सांगितले. त्यावेळी ट्रकजवळ फिरोज खान व पाळधीचा तस्लिम खान दोघे हजर होते. विचारणा केल्यावर ‘साहब, जीएसटी का नाटक चल रहा है, इसलिए खडे है’ असे तो म्हणाला. काय माल आहे, हे पाहण्यासाठी ट्रकमध्ये डोकावल्यावर पॅक गठाणी दिसून आल्या. मात्र त्यावर मालाचा बॅच नंबर कोड आणि भरुच येथील मालाचा स्टॅम्प दिसल्याने पोलिस उपनिरीक्षक खंडागळे, अश्रफ शेख या दोघांनी त्याचा मोबाईलमध्ये फोटो घेत उभ्या जागीच चौकशी सुरू केली. पोलिस ठाण्यात येऊन कंपनीला फोन लावल्यावर वेगळाच प्रकार आढळून आल्याने मात्र दोन्ही ट्रकचालकांना होते तेथेच उभे करण्यात आले.  

गाडीचा व मालाचा विमा असतो, याची खात्री चालकांना पूर्वीपासूनच असते. परिणामी ट्रकसह माल लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्या एशियन महामार्गावर गुन्हे करतात. आजच्या प्रकरणात ट्रकची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली, टोळीत आणखी इतर कोण आहेत, याबाबतचा तपास सुरू असून, इतर संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल.
- सुनील कुराडे, निरीक्षक, औद्योगिक वसाहत पोलिस ठाणे

Web Title: jalgav news Truck going from Nagpur to Gujarat disappeared from Jalgaon