महिलांमध्ये उद्‌भवताहेत पोटाचे, रक्ताक्षयाचे विकार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

कामाच्या ताणामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष; वेळीच उपचार आवश्‍यक
जळगाव - सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना घर सांभाळण्याबरोबरच नोकरी किंवा व्यवसायात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशावेळी बऱ्याचदा त्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. पर्यायाने अनेक आजारांना सामोरे जावे लागते. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील बहुतांश महिलांमध्ये पोटाचे व रक्ताक्षयाचे विकार उद्‌भवताना दिसून येत आहेत. महिलांनी याकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.  

महिलांच्या शरीरात मासिक पाळीमुळे दर महिन्यात रक्ताचे प्रमाण कमी-अधिक होते. शिवाय गरोदर स्त्रीला तर रक्ताची जास्तच गरज असते. जिल्ह्यात महिलांना सर्वाधिक रक्तक्षयाचा आजार भेडसावत आहे. यातूनच प्रसूतिपूर्वी किंवा प्रसूतीनंतर प्रकृती खालावून महिला दगावत आहेत. अलीकडे हे प्रमाण कमी होत असले तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळविणे आरोग्य विभागाला शक्‍य झालेले नाही. त्यातच अधिकतर महिला व मुली या नोकरदार असल्याने त्यांना कामाच्या ताणतणावांमुळे मासिक पाळीच्या समस्या भेडसावत आहे. यासाठी महिलांनी वेळीच उपचार घेणे आवश्‍यक आहे.

‘फायब्रॉइड’चे वाढते प्रमाण
हल्ली ‘फायब्रॉइड’चे प्रमाण महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. पोटातील पिशवीमध्ये जर ‘फायब्रॉइड्‌स’ असेल तर रुग्णाला महिना झाल्यावर खूप रक्तस्राव होत राहतो. त्याचबरोबर खूप वेदनादेखील होतात. फायब्रॉइड्‌स जेव्हा मूत्राशयावर आपला दाब निर्माण करतो तेव्हा रुग्णाला सारखी लघवी होणार आहे, असा भास होऊ शकतो. यासोबतच ओवेरियन ट्यूमर्स, गर्भाशयाच्या नळीला सूज येणे, तसेच अन्य गर्भाशयाच्या आतमध्ये होणारे पॉलिप, सिस्ट आदी आजार देखील महिलांमध्ये काही प्रमाणात आढळून येत आहे.

मुलींच्या पौगंडावस्थेतील समस्या
बदलत्या जीवनशैलीच्या प्रभाव जसा इतरांवर पडतो तसाच १० ते १८ वयोगटातील मुलींवरही पडत असतो. त्यातून निर्माण होणारी शारीरिक व भावनिक घुसमट नकळत काही शारीरिक बदल घडवत असते. यातूनच कमी वयात वा उशिरा मासिक पाळीस सुरवात होणे, अतिरक्तस्राव, अनियमितता, स्वभावातील बदल, हार्मोनल अनियमित आदी त्रास उद्भवतात. हा त्रास कमी करण्यासाठी मुलींनी वेळोवेळी डॉक्‍टरांचा सल्ला व उपचार घेणे गरजेचे आहे. 

आजकाल महिला व मुलींना कामाचा अधिक ताण असतो. यामुळे त्यांच्या शरीरावर याचा परिणाम होतो. यात अधिकतर समस्या या मासिक पाळी व गरोदरपणात निर्माण होतात. या समस्या कमी करण्यासाठी महिलांनी वेळीच उपचार घेणे आवश्‍यक आहे.
- डॉ. पूनम दुसाने (स्त्रीरोगतज्ज्ञ)

Web Title: jalgav news women stomach blood pressure sickness increase