जळगावच्या कायदा-व्यवस्थेला लागणार शिस्त! 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 July 2019

जळगावच्या कायदा-व्यवस्थेला लागणार शिस्त! 

जळगावच्या कायदा-व्यवस्थेला लागणार शिस्त! 

जळगाव: वाळूमाफिया, गावगुंड, जातीय संवेदनशील आणि अंतर्गत गुन्हेगारीसह आता कॉलेज गॅंगवारने धगधगत असलेल्या जळगाव शहरात पोलिसदलाच्या दबदब्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. अशात अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचे याआधीचे "ट्रॅक रेकार्ड' बघता जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेला त्या शिस्त लावतील, असे मानले जात आहे. त्यातूनच त्यांच्याकडे "लेडी सिंघम' म्हणून त्यांच्याकडे पदभार घेण्याआधीच पाहिले जात आहे. 
राजकीय वरदहस्त असलेली गुंडगिरी आणि प्रशासनात अतिरिक्त लुडबूड आदी कारणांमुळे नवीन आयपीएस अधिकारी जळगावला येण्यास धजावत नाही. पोलिस खात्यात "पनिशमेंट' पोस्टिंग म्हणून गडचिरोली-चंद्रपूर नंतर आता जळगाव जिल्ह्याची वर्णी लागली असून, कुठलेच खात्यातील अधिकारी येण्यास इच्छुक नसल्याची परिस्थिती राज्यभरात आहे. अशात भाग्यश्री नवटके अप्पर अधीक्षक म्हणून लाभल्या असून, पोलिसदलाची प्रतिमा, उंचावण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे. 

"क्राइम एसपी'ची ओळख 
एकेकाळी संतोष रस्तोगी- धनंजय कुळकर्णी, प्रकाश मुत्याळ- ईशु सिंधू, एस. जयकुमार-एन. अंबिका अशा अधिकाऱ्यांच्या जोडीने जिल्ह्यावर वचक निर्माण केला होता. अप्पर पोलिस अधीक्षकपद नेहमीच कर्तबगारीचे पद राहिले असून, "क्राईम एसपी' म्हणून अनेक अधिकाऱ्यांनी हे पद गाजवले. 

नवटकेंचे "ट्रॅक रेकॉर्ड' 
भाग्यश्री नवटके यांची अप्पर अधीक्षकपदी नियुक्ती झाली असून, त्यांचा "ट्रॅक रेकॉर्ड' बघता माझलगाव (बीड)येथे सहाय्यक अधीक्षक असताना त्यांनी वाळूमाफियांना सळो की, पळो करून सोडले होते. मात्र, जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य आणि ऍट्रॉसिटीच्या प्रकरणात वादग्रस्त व्हिडिओ क्‍लिपमुळे त्यांना पायउतारही व्हावे लागले. बीड येथून त्यांची औरंगाबाद येथे उचलबांगडी करण्यात आली होती. सामान्य कुटुंबातील आणि मेहनती तशाच गुंड, गुन्हेगार, माफियांचा कर्दनकाळ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. 

परिस्थिती बदलणार? 
जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बासनात गुंढाळल्याची परिस्थिती आहे. नित्याच्या घरफोड्या, किरकोळ गुंडांच्या हातातही रिव्हॉल्वरसारखे घातक हत्यार आले असून भुसावळ, अमळनेर, जळगावात अचानक केव्हा गोळीबार होईल सांगता येत नाही. "अनसोल्व्हड्‌ मर्डर मिस्ट्री' म्हणून भादली हत्या प्रकरण, निंबोल दरोडा, आर्थिक गुन्हे, वाघुर, अटलांटा आणि विमानतळ अपहार प्रकरणात पोलिसदलाची कचखाऊ भूमिकेमुळे बेसिक पोलिसिंग नष्ट झाल्याची स्थिती आहे. अशात अप्पर अधीक्षक म्हणून भाग्यश्री नवटके यांची जळगावात बदली झाल्याने परिस्थिती बदलण्याची चिन्हे दिसू लागल्याची चर्चा पोलिसदलातून सुरू झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JALGON MARATHI news kayda vyavasta