माळी समाजाचे मोठे संघटन उभारण्याकडे कल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

माळी समाजाचे मोठे संघटन उभारण्याकडे कल 

माळी समाजाचे मोठे संघटन उभारण्याकडे कल 

जळगाव ः माळी समाज कष्टकरी, शेतकरी असल्याने शिक्षणामध्ये काहीसा मागे आहे. शिक्षणामध्ये समाजातील युवक- युवतींनी पुढे जाऊन समाजाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, उद्योगासाठी मार्गदर्शन करणे, समाज मोठा असल्याने समाजाला लोकप्रतिनिधी मिळवून देण्यासह फुले जयंती, पुण्यतिथी आदी उत्सवाबरोबरच पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिकाधिक वृक्ष लावण्यासाठी प्रयत्नशील राहू. माळी समाजासह पोट जातींना एकत्र करून समाजाचे मोठे संघटन उभारण्यात येईल, अशी भूमिका 
खानदेश माळी महासंघ, युवक माळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी "सकाळ- संवाद' कार्यक्रमात व्यक्त केली. सकाळ'च्या शहर कार्यालयात "सकाळ- संवाद' हा कार्यक्रम झाला. 

जलसंधारणावर दिला भर 
मुरलीधर महाजन (संस्थापक प्रदेशाध्यक्ष, खानदेश माळी महासंघ) ः समाजात शिक्षणाबाबत पाहिजे तशी ओढ नसल्याने समाजातील मोजकेच विद्यार्थी अधिकारी होतात. सावता माळी समाजाचे होस्टेल आहे. त्याची अवस्था भयावह आहे. लोकप्रतिनिधित्वाची संधी या समाजाला दिली पाहिजे. आम्ही वधू-वर मेळावा घेतो, त्याला समाजाने प्रोत्साहन दिले पाहिजे. कळमसरा (ता. अमळनेर) येथे उपसरपंच आहे. "रामनाम' पाझर तलावाची मी निर्मिती केली होती. आता झालेल्या पावसाने पाच ते सात गावांचा पाणीप्रश्‍न मिटला आहे. 

सामूहिक विवाह रुजविले मात्र.. 
गजानन महाजन (जिल्हाध्यक्ष, खानदेश माळी महासंघ)ः समाजात अनेक कुटुंबांतील उपवर मुला-मुलींचे विवाह सामूहिक पद्धतीने लावण्याचा उपक्रम मागील पाच वर्षे यशस्वीपणे राबविला. आम्ही अकरा पदाधिकारी मिळून राज्यभर फिरलो. समाजबांधवांकडून व स्वतःही आर्थिक मदत करून सामूहिक विवाह सोहळ्याची प्रथा सुरू केली होती. त्याद्वारे समाजबांधवांची आर्थिक व वेळेची बचत होत असे. गेल्या वर्षापासून समाजबांधवांचा याला अत्यल्प प्रतिसाद मिळतो, याची खंत आहे. 

गुणवंतांचा सत्कार 
शरद मोरे (सचिव संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान) ः काही वर्षांपूर्वी समाजातील विधवा, घटस्फोटित, अपंगांचा वधू-वर परिचय व पालक मेळावा घेतला. त्यातील 6-8 विवाह जुळले होते. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्कार केला जातो. चारशे ते पाचशे विद्यार्थी यावेळी उपस्थित असतात. लवकरच विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी सुरू करण्याचे नियोजन आहे. 

उद्योगासाठी तरुणांना सहकार्य 
संतोष इंगळे (प्रदेश उपाध्यक्ष, खानदेश माळी महासंघ) ः माळी समाजातील सर्व समाज बांधवांना एकत्रित होण्यासाठी दरवर्षी महासंघ विविध उपक्रम राबवितो. समाजाची प्रगती होणे हा त्यामागील हेतू आहे. मी चटई उद्योजक आहे. उद्योग उभारताना येणाऱ्या अडचणींची जाण असल्याने समाजातील युवकांना उद्योग उभारणीसाठी मोफत मार्गदर्शन करतो. समाजातील गरजूंना अडचणीच्या वेळी मदत करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करून स्वयंरोजगार कसा मिळेल, याकडे कल असतो. 

उच्चशिक्षणाची आवश्‍यकता 
कृष्णा माळी (युवक अध्यक्ष, खानदेश माळी महासंघ) ः समाजातील युवक -युवतींना अद्यापही उच्च शिक्षण घेता येत नाही. आयएएस, आयपीएस अधिकारी समाजाचे नाहीत. माळी समाजाचे होस्टेल आहे; मात्र त्यांना विद्यार्थ्यांना योग्य सुविधा देत नाहीत. यामुळे समाजातील मुले अधिकारीपदापर्यंत पोचत नाही. समाज बांधवांनी अंधश्रद्धा न बाळगता, संत शिरोमणी सावता माळी यांच्या दिलेल्या शिकवणीनुसार आचरण करावे. 

हरित परिसराचे स्वप्न 
वसंत पाटील (प्रदेश सरचिटणीस, खानदेश माळी महासंघ) ः सर्वत्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस कमी होत आहे. वातावरणावरही परिणाम होत आहे. यामुळे सावतामाळीनगर परिसरात हरित क्रांती करण्याचा प्रयत्न आहे. सोबतच महासंघाच्या प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाला पाच झाडे लावण्याचा संकल्प आहे. समाजातील सर्व पोटजातींना एकसंध बांधून समाजाचे मोठे संघटन उभे करण्यावर पदाधिकारी भर देत आहेत. 

समाजाला लोकप्रतिनिधित्व द्या 
रामू बी. सैनी (जिल्हा उपाध्यक्ष, खानदेश माळी महासंघ) ः आम्ही सर्व पदाधिकारी समाजाचे काम संघटितपणे करतो. समाजाचा विकास व्हावा, समाज बांधवांचे जीवनमान उंचवावे, यासाठी प्रयत्न करतो. समाज एकसंध राहण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या सामाजिक उपक्रमांचा गवगवा खानदेशातच नव्हेतर राज्यात आहे. यामुळे आमचा एकतरी समाजबांधव लोकप्रतिनिधी असायलाच पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. 

स्वयंरोजगाराकडे वळा 
नंदू पाटील (अध्यक्ष, महात्मा फुले बहुद्देशीय संस्था) ः अठरा वर्षांपूर्वी शनिपेठ परिसरात समाजाचे पंचमंडळ होते. तेथे मी अतिशय अल्प दरात झुणकाभाकर केंद्र सुरू केले होते. नंतर ते बंद करण्यात आले. मी हॉकर्स असून, समाजोपयोगी कामे करण्यात व्यस्त असतो. समाजात ज्यांना दोन कन्यारत्ने आहेत, त्यांचा आम्ही सत्कार करतो. माझे युवकांना आवाहन आहे, की त्यांनी नोकरीपेक्षा स्वयंरोजगाराकडे वळावे. मार्गदर्शन मी करेन. 

वृक्षारोपणाकडे कल 
ज्ञानेश्‍वर महाजन (कार्याध्यक्ष, युवक जिल्हा खानदेश माळी महासंघ) ः समाजाच्या विविध कार्यात माझे सहकार्य असते. समाजाची प्रगती व्हावी, समाज बांधवांची उन्नती व्हावे हाच त्यामागील हेतू असतो. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. त्यावर सध्या भर देत आहे. 

मोफत सामूहिक विवाह सोहळा तरी.. 
महासंघातर्फे गेल्या पाच वर्षांपासून माळी समाजातील विवाहेच्छुकांचा सामूहिक विवाह पद्धतीने केला जात होता. यात संबंधित वधू-वर पित्याकडून एक रुपयातही घेतला जात नसे. यामुळे समाज बांधवांचा खर्च वाचतो. मात्र, गेल्या वर्षापासून माळी समाजबांधवांनी आपल्या उप-वर मुला-मुलींचे मोफत विवाह करून देण्याच्या उपक्रमाकडे पाठ फिरविल्याची खंत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

वसतिगृहाची स्थिती सुधारावी 
माळी समाजाचे वसतिगृह आहे. मात्र, त्याची दुरवस्था असल्याने माळी समाजाच्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यात समाजाच्या मुलांना कमी प्रवेश तर इतरांनाच जादा प्रवेश दिला जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. जर संबंधितांना वसतिगृह चालविता येत नसेल तर त्यांनी कार्यक्षम पदाधिकाऱ्यांना वसतिगृह चालविण्यास देण्याची भूमिकाही मांडण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgon marathi news mali sagahtna