"मनपा'चे 1,458 कोटींचे सुधारित अंदाजपत्रक! 

"मनपा'चे 1,458 कोटींचे सुधारित अंदाजपत्रक! 


जळगाव ः महापालिकेच्या 2018-19 चे सुधारित अंदाजपत्रक व 2019-20 चे मूळ अंदाजपत्रक, असे एक हजार 270 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीत मंजूर झाले होते. या अंदाजपत्रकात 139 कोटी 75 लाखांची वाढ करण्यात आली असून, सुधारित एक हजार 458 कोटींचे अंदाजपत्रक आज विशेष महासभेत स्थायी समितींनी सभापतींनी मांडले. या अंदाजपत्रकाला महासभेने मंजुरी दिली. 

महापालिकेत आज अंदाजपत्राबाबत विशेष महासभा महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, आयुक्त चंद्रकांत डांगे, नगरसचिव सुनील गोराणे आदी व्यासपीठावर होते. सुरवातीला स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे यांनी महापालिकेचे 2018- 19 वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक व 2019-20 वर्षाचे मूळ अंदाजपत्रक सभेपुढे सादर केले. तसेच 26 फेब्रुवारीला स्थायी समितीच्या सभेत मंजूर झालेल्या अंदाजपत्रकाचे वाचन करून 139 कोटी 75 लाख वाढ असलेले एक हजार 458 कोटींचे सुधारित अंदाजपत्रक विशेष महासभेपुढे मांडण्यात आले. उपमहापौर डॉ. सोनवणे यांनी अंदाजपत्रक मंजूर झाल्याचे जाहीर केले. 

अंदाजपत्रकाचे उद्दिष्ट पूर्ण करा : लढ्ढा 
अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याने शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी सभापती व सभागृहाचे आभार मानले. तसेच सुटसुटीत असे अंदाजपत्रक असून, प्रशासनाने या अंदाजपत्रकातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. 

अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये 
- एक-दोन मुली असल्यास घरपट्टी करात एक टक्का सूट 
- शहरातील खेळाडूंना प्रोत्साहनासाठी विशेष निधीची तरतूद 
- कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक 
- उत्पन्न मिळकतीसाठी खुले भूखंड, मुदत संपलेले गाळे, थकबाकी वसुलीवर भर 
- जुन्या उद्यानांसाठी भरीव तरतुदी 

अंदाजपत्रकातील वाढीव तरतुदी 
उद्याने व्यवस्था दुरुस्ती- 5 कोटी, औषधी, उपकरणे, रसायने- 1 कोटी, नवीन ट्रॅफिक सिग्नल व्यवस्था- 1 कोटी, स्मशानभूमी व्यवस्था व दुरुस्ती- 1 कोटी, रस्तेदुरुस्ती (प्रत्येक प्रभाग समिती)- 50 लाख, गटार दुरुस्ती- 1 कोटी, स्वच्छतागृहे, शौचालयांची दुरुस्ती- 50 लाख, 
व्यापारी संकुले दुरुस्ती- 1 कोटी, क्रीडा स्पर्धा, महापौर चषक- 25 लाख, अंध व अपंग कल्याणनिधी- 3 कोटी, नवीन स्वच्छतागृहे, शौचालये- 3 कोटी, नवीन इमारती- 1 कोटी, नवीन स्मशानभूमी- 1 कोटी, स्मशानभूमी लाकूड पुरवणे- 1 कोटी, नागरिक अपघात विमा- 1 कोटी. 

नव्याने करण्यात आलेल्या तरतुदी 
प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या अंदाजपत्रकात तरतूद नसलेल्या काही बाबींवर चर्चा करून नव्याने काही विषयांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यात महापुरुषांचे नवीन पुतळे बसविणे- 1 कोटी, क्रीडासाहित्य- 1 कोटी, बालगंधर्व खुले नाट्यगृह- 20 लाख, राज्य व राष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन- 50 लाख, चौपदरीकरणातील दुभाजकांवर पथदिवे बसविणे- 7 कोटी, अविकसित हरितक्षेत्र व साठवण 
बंधारे विकसित करणे- दोन कोटी, दीक्षाभूमी बांधणे- 2 कोटी रुपये, अशा तरतुदी नव्याने करण्यात आल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com