गिरीश महाजनांचा षटकार  रोखण्याचा आघाडीकडून प्रयत्न 

गिरीश महाजनांचा षटकार  रोखण्याचा आघाडीकडून प्रयत्न 

गिरीश महाजनांचा षटकार 
रोखण्याचा आघाडीकडून प्रयत्न 


जामनेर : राज्यभरातील राजकारणी मंडळीचे लक्ष लागून असलेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे आपली उमेदवारी गुरुवारी (ता. ३) दाखल करणार असल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले, तर दुसरीकडे काँग्रेस आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संजय गरुड हे सुद्धा आपली उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसे पाहिले तर आघाडीमध्ये जामनेरची जागा कोणत्या काँग्रेसला सोडण्यात आली. याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे राष्ट्रीय काँग्रेसकडूनही जामनेरच्या जागेसाठी वरिष्ठ पातळीवरून जोर लावला जात आहे. 
संजय गरुड आणि मंडळींनी तालुका पिंजून काढून आघाडीची जागा राष्ट्रवादीलाच सुटणार असल्याचे छातीठोकपणे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी मतदारांना जागो-जागी भेटी घेऊन सांगत आहेत. त्याच जोरावर आघाडीचे उमेदवार म्हणून गुरुवारी गरूडही जय्यत तयारीला आधीपासून लागलेले आहेत. शेंदुर्णीत घेण्यात आलेल्या संयुक्त मेळाव्याद्वारे स्थानिक पातळीवरील नेते मंडळींनिही संजय गरूड हेच पालकमंत्र्यांपुढे सक्षम उमेदवार ठरू शकतील, त्यासाठीच जामनेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी एकमुखी मागणी केली होतीच. 

आघाडीकडून प्रयत्न 
गेल्या २५ वर्षांपासून सतत पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम गिरीश महाजनांनी केलेला आहे. आता षटकार मारण्यासाठी मैदानात उतरणार असल्यामुळे त्यांचा हा षटकार रोखण्यासाठी राज्यभरातील विरोधक नेतेमंडळीही कामाला लागल्याचे मतदारसंघात एकंदरीत दिसते आहे. त्यामुळेच अनेक दिवसांपासून आघाडीच्यावतीने मजबूत उमेदवार शोधण्यात येत होता. मात्र, आता पुन्हा तिसऱ्यांदा गिरीश महाजन आणि संजय गरूडांचा आमना-सामना मतदारांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी राज्यसभेचे माजी खासदार ईश्वरलाल जैन दोनवेळा, डी. के. पाटील एकदा अशा लढती झाल्या होत्या. राज्यातील सरकार असो वा पक्ष, गिरीश महाजनांचे राजकीय वजन नक्कीच वाढल्याचे चित्र आहे. त्याचाच भाग म्हणून की काय त्यांच्याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, आणि हेच वाढलेल्या वर्चस्वाला लगाम लावण्याच्या हेतूने काँग्रेस आघाडीकडून कसोशिने प्रयत्न केले जात आहे. आघाडीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह पदाधिकारीही मतदारसंघात कामाला लागल्याचे त्यांच्या देहबोलीवरून सध्यातरी दिसते आहे. गेल्या पाचवेळा मतदारसंघातून सहजरीत्या विजयी झालेले पालकमंत्री महाजनही सहाव्यांदाही विजयाबाबत निश्‍चिंत असले तरी, त्यांची नियोजितपणे उभारण्यात आलेली प्रचारयंत्रणा त्यातील पदाधिकरी, कार्यकर्ते मात्र कुठेही कमतरता राहू नये म्हणून सतर्क दिसत आहेत. काँग्रेस आघाडी महाजनांच्या षटकाराचा फटका हवेतल्या हवेतच झेलण्याच्या आटोकाट प्रयत्नात आहेत. त्यामुळे आता आघाडीचे संजय गरूड गिरीश महाजनांचा षटकार कसा रोखतात हे पाहणे जामनेर मतदारसंघासाठीच नाहीतर संपूर्ण राज्यासाठी औत्सुख्याचा विषय ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com